जुगनाळा शाळेतील विद्यार्थ्यांनी फुलवली परसबाग

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रम्हपुरी :- ब्रह्मपुरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा,जुगनाळा ही बेटाळा केंद्रातील उपक्रमशील शाळा म्हणून प्रसिद्ध असून येथे नवनवे उपक्रम राबविले जातात.
माननीय मुख्याधिकारी व शिक्षणाधिकारी जि.प.चंद्रपूर यांच्या प्रेरणेतून परसबाग हा उपक्रम शाळा शाळांमधून सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून जुगनाळा येथील विद्यार्थ्यांनी स्व कष्टाने परसबाग तथा फुलबाग फुलविलेली आहे. यामध्ये मेथी,पालक,कोथिंबीर ,मुळा ,गाजर,बीट,वांगे ,टमाटर, मिरची,यासारखे पालेभाज्या व फळभाज्यांची लागवड त्यांनी केलेली आहे. दुधी, भोपळा,दोडके,भेंडी, वाल यासारख्या वेलवर्गीय झाडांची देखील लागवड केलेली आहे. श्री गोवर्धन टिकले सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी परसबाग तयार केली असून विद्यार्थी स्वतः परसबागेची देखभाल व काळजी घेतात त्यातून निघालेला भाजीपाला मध्यान भोजन योजनेसाठी व अतिरिक्त भाजीपाल्याची विक्री देखील विद्यार्थी स्वतः करतात.तसेच परसबाग फंडात प्राप्त निधी जमा करतात.
सदर उपक्रमास शाळेचे मुख्याध्यापक गजानन प्रधान सर तसेच प्रभा गणवीर, धनपाल दमके,राजू मोहनकर, अर्चना मरघडे, योगराज बोरकुटे, नयना फुले या सर्व शिक्षकवृंदाचे सहकार्य लाभत असून शाळा व्यवस्थापन समिती व पालक वर्ग व अधिकारी वर्ग यांच्याकडून विद्यार्थ्यांचे कौतुक केले जात आहे. सदर उपक्रमामुळे शाळेच्या सौंदर्यात भर पडलेली आहे.



