गडचांदूर येथे बालकांच्या सुरक्षितता व सक्षमीकरणावर जनजागृती कार्यक्रम संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
गडचांदूर येथील महात्मा गांधी विद्यालयात,माणिकगड सिमेंट वर्क्स च्या सीएसआर व बालकल्याण समिती, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आशा वर्कर, अंगणवाडी सेविका तसेच पोलीस पाटील यांच्यासाठी “बालकांची सुरक्षितता आणि सक्षमीकरण : माझी जबाबदारी” या विषयावर महत्त्वपूर्ण जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात बालकांशी संबंधित कायदे, त्यांची प्रभावी अंमलबजावणी तसेच प्रत्येक बालकाची सुरक्षितता कशी सुनिश्चित करता येईल, याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. सध्याच्या काळात बालकांवर होणाऱ्या अमानवी घटनांची वाढती संख्या लक्षात घेता, सर्व फ्रंटलाईन वर्कर्सना बाल संरक्षण कायदे व त्यामधील स्वतःची भूमिका याची माहिती असणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत वक्त्यांनी व्यक्त केले.
डॉ.ज्योत्स्ना मोहीतकर व श्रीमती वनिता घुमे या प्रमुख वक्त्या होत्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली ठाकोर यांनी केले, तर पुरुषोत्तम गावंडे (पोलीस पाटील, भोयगाव) यांनी आभार प्रदर्शन केले.
यावेळी अॅड. सौ. वनीता घुमे (सदस्या, बालकल्याण समिती) व डॉ. जोस्तना मोहितकर (सदस्या, बालकल्याण समिती) यांनी बालकांशी संबंधित कायदे, हक्क व संरक्षण या विषयांवर महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
श्री. नितीन भोंगळे (महिला व बाल संरक्षण अधिकारी) यांनी बालहक्क, संरक्षण यंत्रणा तसेच शासकीय योजनांची सविस्तर माहिती दिली.
तसेच रीना शिंदे, विभाग प्रमुख, माणिकगड सिमेंट वर्क्स यांनी स्त्रीशक्ती व महिला सक्षमीकरण या विषयावर आपले विचार मांडले.
या कार्यक्रमाला एकूण ७९ फ्रंटलाईन वर्कर्स उपस्थित होते. माणिकगड सिमेंट वर्क्सच्या सीएसआर अंतर्गत सर्व मान्यवरांचा स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच सर्व सहभागींसाठी वही व पेनचे वितरण करण्यात आले व अल्पोपहाराचीही व्यवस्था करण्यात आली.
कोरपना व राजुरा परिसरातील उपस्थित फ्रंटलाईन वर्कर्सनी हा कार्यक्रम अत्यंत उपयुक्त, ज्ञानवर्धक व काळाची गरज असल्याची भावना व्यक्त केली. भविष्यातही अशा प्रकारचे जनजागृती कार्यक्रम राबविण्यात यावेत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी या उपक्रमासाठी माणिकगड सिमेंट वर्क्स सीएसआर टीमचे मनःपूर्वक आभार मानले.



