जिवती ते परमडोली रस्त्याला झुडपांचा विळखा!
सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष ; जीव गेल्यावरच येणार का जाग?

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- ग्रामीण भागाचा विकास व्हावा, त्यांची शहरांशी नाळ जुळली जावी म्हणून तालुक्यात अनेक योजनांतून रस्त्यांची निर्मिती करण्यात आली. त्यात जिवती ते परमडोली हा रस्ता शेजारील तेलंगणा राज्याला जोडणारा असल्याने या रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असते हा रस्ता राज्य मार्ग क्र ३७३ असून सुद्धा अत्यंत अरुंद व एकेरी असल्याने या रस्त्यालगत अनेक ठिकाणी असलेल्या वळणावरील झाडाझुडपांचा विळखा अपघाताला आमंत्रण देत आहे, याकडे संबंधित सार्वजनिक खात्याचे दुर्लक्ष होत असल्याने प्रवासी, वाहनचालक, व नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत असून साईटपट्ट्या साफ करण्याची मागणी देखील केली जात आहे.
मात्र संबंधित विभाग या रस्त्याची योग्य देखभाल व दुरूस्ती सुद्धा करत नसल्याने परिणामी हा रस्ता अनेक ठिकाणी धोकादाय झाला आहे. सध्या राज्यात झालेल्या जोरदार पावसामुळे ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांना झूडपी वनस्पतींचा विळखा पडल्याचे दिसून येत आहे. असे रस्ते वळण मार्गावर अधीकच धोकादायक ठरत असून अपघाताला आमंत्रण देणारे आहेत. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.
सध्या तालुक्यातील अनेक रस्ते खड्डेमय झाले आहेत. ग्रामीण भाग जोडण्यासाठी अनेक रस्त्यांची रस्त्यांच्या देखभाल, दुरूस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने अनेक रस्त्याच्या कडेला झूडपी वनस्पतींची प्रचंड वाढ झालेली दिसते. झुडपांचा विळखा पडल्याने समोरून येणारी वाहने दिसणेही कठीण झाले आहे. रस्त्यावर अचानक समोरून वाहन आल्यास अपघाताची शक्यता बळावत आहे.
यामुळे प्रवाशांना जीव धोक्यात घालून ग्रामीण भागातून प्रवास करावा लागतो. जिवती तालुका हा जंगलव्याप्त असल्याने अशा ठिकाणातून जाणारे रस्ते तर अधिकच धोकादायक ठरत आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याने याकडे लक्ष देत रस्त्याच्या कडेला वाढलेली झूडपी वनस्पतींची वेळोवेळी कापणी करून होणाऱ्या अपघातांना आळा घालावा यावेळी एखाद्याचा जीव गेल्यावरच संबंधित विभागाला जाग येणार का,असा सवाल परिसरातील संतप्त नागरिकासह, वाहनचालक व प्रवाशांकडून उपस्थित होत आहे. तरी संबंधित विभागाने तत्काळ या रस्त्यालगत असलेली झुडपी कापून हा रस्ता मोकळा करावा अशी मागणी करण्यात येत आहे.
जिवती ते परमडोली दरम्यान रस्त्याच्या बाजूला उगवलेल्या काटेरी झाडे झुडपामुळे धोकादायक वळण लक्षात येत नाही त्यामुळे येथे भीषण अपघात होऊ शकतो संबंधित विभागाने त्वरित ही झाडे झुडपे काढून टाकावीत.
– संतोष इंद्राळे जिवती.



