नायलॉन मांजाच्या विक्रीवर बंदी घालण्याची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
पर्यावरण, पक्षी व मानवी जीवनास घातक ठरणाऱ्या नायलॉन मांजाच्या विक्री व साठवणीवर तात्काळ बंदी घालावी, अशी मागणी ईको-प्रो या पर्यावरण संरक्षण संस्थेने नगर परिषद प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
भद्रावती शहर व परिसरातील विविध दुकानांमध्ये नायलॉनपासून तयार करण्यात आलेल्या मांजाची सर्रास विक्री सुरू असल्याचे निदर्शनास येत असून, पतंगबाजीदरम्यान तुटलेला मांजा झाडांवर, घरांवर व विद्युत तारांवर अडकून राहतो. हा मांजा अतिशय बारीक व अनाशवंत असल्याने पक्षी त्यात अडकून गंभीर जखमी होतात किंवा आपले प्राण गमावतात, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
नायलॉन मांजा कुजत नसल्याने पर्यावरणीय प्रदूषण वाढते. तसेच हा मांजा गटारे व नाल्यांमध्ये अडकून सांडपाणी व्यवस्थेत अडथळा निर्माण करतो. जमिनीवर पडलेला मांजा जनावरांच्या पोटात गेल्यास त्यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. याशिवाय विद्युत वाहिन्यांमध्ये अडकलेल्या मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्यासह अपघाताची शक्यताही निर्माण होते.
मागील वर्षी शहरातील एका ठिकाणी नायलॉन मांजामध्ये अडकलेल्या पक्ष्याचे प्राण ईको-प्रो संस्थेच्या स्वयंसेवकांनी जीव धोक्यात घालून वाचविल्याची घटना निवेदनात नमूद करण्यात आली आहे. दरवर्षी जानेवारी महिन्यात मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नायलॉन मांजा व प्लास्टिक पतंगांची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असल्याने, त्यापूर्वीच संबंधित विक्रेत्यांवर कारवाई व साहित्य जप्त करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
पर्यावरण संरक्षण, पक्षी संवर्धन व मानवी सुरक्षिततेच्या दृष्टीने नायलॉन मांजावर तात्काळ बंदी घालून कठोर अंमलबजावणी करावी, असे आवाहन ईको-प्रो भद्रावती तालुका अध्यक्ष संदीप जिवने यांनी केले आहे.



