स्थानिक उद्योगांच्या गरजेनुसार आयटीआयमध्ये नवे अभ्यासक्रम सुरू करा – ना. मंगल प्रभात लोढा
जिल्हा नियोजन भवनात अल्पकालीन अभ्यासक्रमांचा आढावा

चांदा ब्लास्ट
स्थानिक उद्योगांच्या गरजा लक्षात घेऊन औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) नवे, उद्योगाभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्यात यावेत, असे प्रतिपादन राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री ना. मंगल प्रभात लोढा यांनी केले.
ल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय तसेच जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा नियोजन भवनात अल्पकालीन अभ्यासक्रमांच्या अंमलबजावणीबाबत आयोजित विशेष आढावा बैठकीत ते बोलत होते.
अल्पकालीन अभ्यासक्रमांमुळे युवकांना तात्काळ रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. त्यामुळे स्थानिक कारखाने व उद्योगांना आवश्यक असलेले प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करणे हे आयटीआयचे प्रमुख उद्दिष्ट असले पाहिजे. यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि औद्योगिक आस्थापनांमध्ये सातत्यपूर्ण व सकारात्मक संवाद आवश्यक असल्याचे ना. लोढा यांनी नमूद केले.
या बैठकीस व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालक माधवी सरदेशमुख, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, राज्य नवोपक्रम सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकांत पाटील, सहसंचालक पी.टी. देवतळे, उपायुक्त प्रकाश देशमाने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षिरसागर, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी वैभव बोनगीरवार, सहाय्यक आयुक्त अनिसा तडवी आदी उपस्थित होते.
बैठकीत गोंडवाना विद्यापीठातर्फे प्रा. मनीष उत्तरवार यांनी कौशल्य विकास उपक्रमांचे सादरीकरण केले. डॉ. श्रीकांत पाटील यांनी मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनेची माहिती दिली. चंद्रपूर जिल्ह्याचा कौशल्य विकास आढावा वैभव बोनगीरवार यांनी तर गडचिरोली जिल्ह्याचा आढावा प्राचार्य चौधरी यांनी सादर केला. संचालक माधवी सरदेशमुख यांनी दोन्ही जिल्ह्यांतील शॉर्ट टर्म कोर्सच्या कार्यपद्धतीवर मार्गदर्शन करून आयएमसी सदस्यांशी चर्चा केली आणि औद्योगिक आस्थापना व आयएमसी सदस्यांचे सहकार्य अत्यावश्यक असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बंडोपंत बोढेकर यांनी तर आभार सहाय्यक आयुक्त अनिसा तडवी यांनी मानले. बैठकीच्या यशस्वीतेसाठी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी वैभव बोनगीरवार, जिल्हा कौशल्य विकास केंद्र तसेच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूरच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. बैठकीस जिल्ह्यातील शासकीय व खाजगी आयटीआयचे अधिकारी, प्रतिनिधी तसेच आयएमसी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.



