जैन विकास आर्थिक महामंडळासाठी15 कोटी रूपयांचा निधी मंजुर – ललित गांधी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
जैन समाजाच्या धार्मिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी गेल्यावर्षी स्थापन केलेल्या जैन अल्पसंयक विकास आर्थिक महामंडळ साठी पहिल्या टप्प्यात 15 कोटी 40 लाखांचा निधि विधानसभेत पुरवणी मागण्यांच्या माध्यमातुन मंजूर झाला असल्याची माहीती जैन महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.
धर्मक्षेत्रांचा विकास, सामाजिक उपक्रम, साक्षरता, उद्योग-व्यापार या विविध क्षेत्रात अग्रणी असलेल्या जैन समाजातील अल्प उत्पन्न गटातील लोकांच्या आर्थिक व सामाजिक विकासाबरोबर विद्यार्थ्यांच्या उच्चशिक्षणासाठी, तसेच युवक व महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी व्यापार, उद्योग सुरू करता यावेत यासाठी भांडवलाचा पुरवठा करता यावा यासाठीच्या विविध योजनांबरोबरच जैन समाजाच्या धर्मक्षेत्रांची सुरक्षा, साधु-संतांच्या पायी विहारासाठी व्यवस्था, प्राचीन ग्रंथांचे संरक्षण व संवर्धन या उद्देशांसाठी जैन समाजाचे स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे अशी मागणी अखिल भारतीय जैन अल्पसंयक महासंघ चे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांनी महाराष्ट्र सरकारकडे केली होती.
जैन महासंघाची ही मागणी मान्य करून महाराष्ट्र सरकारने 04 ऑक्टोबर 2024 रोजी जैन समाजासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला. असा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले. महामंडळ स्थापनेनंतर नोंदणी व अन्य तांत्रिक प्रक्रिया पुर्ण होण्यासाठी वर्षापेक्षा अधिक कालावधी लागला. सर्व तांत्रिक प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे भाग भांडवलाचा पहिला हप्ता 5 कोटी व विविध योजनांच्या सानुग्रह अनुदानासाठी 10 कोटी, आरंभिक खर्चाच्या योजनांसाठी 40 लाख असे एकुण 15 कोटी 40 लाखाचा निधि विधिमंडळाने शुक्रवारी मंजूर केला असल्याची माहीती ललित गांधी यांनी दिली.
या निधि मंजूरीमुळे महामंडळाच्या योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचा मार्ग खुला झाला असुन लवकरच कार्यवाही सुरू केली जाईल असे सांगुन गांधी पुढे म्हणाले की सानुग्रह अनुदानाची 10 कोटीचा निधि मंजूर झाल्याने 100 कोटी पर्यंतचा कर्जपुरवठा करणे शक्य होणार आहे.
महामंडळाच्या योजनांच्या कियान्वयनासाठी बुधवार, गुरूवार ललित गांधी यांनी अल्पसंख्याक कार्यमंत्री माणिकराव कोकाटे, राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ व विविध अधिकार्यांची नागपूर येथे भेट घेऊन पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश येऊन निधिचा पहिला टप्पा मंजूर केल्याबद्दल ललित गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार यांच्यासह संबंधित अधिकार्यांचे आभार मानले आहेत.
राज्यात सध्या 24 जिल्ह्यात जैन महामंडळाची जिल्हा कार्यालये कार्यान्वित झाली असून मार्च 2026 अखेर सर्व 36 जिल्हा कार्यालये कार्यान्वित करून संपूर्ण महाराष्ट्रात महामंडळाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल अशी ग्वाही ललित गांधी यांनी दिली.



