ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जुन्या युनिट्समुळे वाढते प्रदूषण, नवीन औष्णिक प्रकल्प आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित हवा – आ. जोरगेवार

९ हजार ८९२ कोटी रुपयातून तयार होणार प्रकल्प 

चांदा ब्लास्ट

शहरात कार्यरत असलेल्या औष्णिक विद्युत केंद्रात कालबाह्य व जुनी युनिट्स अद्याप सुरू असल्याने प्रदुषणाचे प्रमाण वाढत असून प्रस्तावित ८०० मेगाव्हॅट क्षमतेचा नवीन प्रकल्प आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असावा अशी मागणी हिवाळी अधिवेशनात बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.

नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या लक्षवेधी सूचनेवर बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्राशी संबंधित महत्त्वाचा व गंभीर मुद्दा सभागृहासमोर मांडला. चंद्रपूर शहरात कार्यरत असलेल्या सध्याच्या औष्णिक विद्युत प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण वाढत असल्याचे त्यांनी यावेळी बोलतांना सांगितले. चंद्रपूर सीटीपीएसमध्ये ८०० मेगाव्हॅट क्षमतेचे नवीन प्रकल्प प्रस्तावित आहेत का, असा थेट प्रश्न यावेळी त्यांनी शासनाला विचारला. यावर शासनाने सकारात्मक उत्तर देत नवीन संच उभारण्याची तयारी सुरू असल्याचे स्पष्ट केले.

 चंद्रपूर हे मुंबई भद्रावती एचव्हीडीसी डीसी ग्रीड लाईनजवळ असल्याने वीज वहनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे. यासोबतच रेल्वे कनेक्टिव्हिटी, मुबलक पाण्याची उपलब्धता आणि वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडकडून कोळशाचा नियमित पुरवठा या सर्व बाबी चंद्रपूरच्या बाजूने अनुकूल असल्याचे त्यांनी यावेळी सभागृहाला सांगितले. मात्र, जुन्या व प्रदूषण वाढवणार्या युनिट्समुळे चंद्रपूर शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे त्यांनी सभागृहाच्या लक्षात आणुन दिले. या जुन्या युनिट्सऐवजी अल्ट्रा सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावर आधारित ८०० मेगाव्हॅट क्षमतेचे नवीन प्रकल्प टप्प्याटप्प्याने उभारावेत आणि अशी ठाम मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी केली.

 या मागणीला उत्तर देताना मंत्री मेघना बोर्डीकर यांनी भविष्यात उभारण्यात येणारे प्रकल्प आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असतील, ज्यामुळे प्रदूषणात लक्षणीय घट होईल आणि कमी कोळशातून अधिक वीज निर्मिती शक्य होईल, असे सांगितले आहे. तसेच ८०० मेगाव्हॅट क्षमतेच्या या प्रकल्पासाठी अंदाजे ९ हजार ८९२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहितीही त्यांनी सभागृहात दिली.

चंद्रपूर शहरातील वाढते प्रदूषण कमी करून नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठीच ही मागणी करण्यात आल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे. या चर्चेमुळे चंद्रपूरच्या पर्यावरणीय प्रश्नांवर शासनाचे लक्ष केंद्रित झाले असून, भविष्यात प्रदूषणमुक्त आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित वीज प्रकल्प उभारल्या जाणार आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये