ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तेलंगणा ग्रामपंचायतीसाठी महाराष्ट्रातील त्या वादग्रस्त १४ गावात मतदान 

सकाळपासून १ वाजेपर्यंत मतदान अन् संध्याकाळी ४ वाजता मतमोजणी 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यात गेल्या अनेक दशकांपासून वादग्रस्त असलेल्या चार गावांच्या ग्रामपंचायत निवडणुका गुरुवारी (११ डिसेंबर) शांततेत पार पडल्या.वादग्रस्त १४ गावे महाराष्ट्र राज्याचीच असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.मात्र महाराष्ट्र सरकारच्या दुर्लक्षितच राहिली.त्यामुळे आधीच्या आंध्र सरकार व आताचे तेलंगणा सरकारने या गावातील नागरीकांची नावे तेलंगणा मतदार यादीत असल्याचा आधार घेत विविध विकासकामे राबवून येथील नागरिकांचे मने जिंकत निवडणूक लढवित असून येथील नागरिक सुध्दा दुहेरी लाभ घेण्यासाठी दोन्ही राज्यांत मतदानाचा हक्क बजावत आहेत.

           तेलंगणा राज्याच्या आसिफाबाद (कुमरमभिम) केरामेरी मंडल अंतर्गत येणाऱ्या अंतापूर, भोलापठार, मुकादमगुडा, व परमडोली ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी मतदान झाले.निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली. तेलंगणा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. दुपारी १ वाजता मतदान यंत्रे बंद करण्यात आल्यानंतर संध्याकाळी ठीक ४ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. संवेदनशीलता लक्षात घेता मोठ्या पोलिस फौजफाट्याची तैनाती करण्यात आली होती, तरीही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत शांततेत आणि पारदर्शकपणे पूर्ण झाली.

या चार ग्रामपंचायतींमध्ये थेट जनतेतून सरपंच निवड होत असल्याने निवडणुकीला प्रचंड चुरस निर्माण झाली होती. मतदारांनीही उत्साहाने सहभाग घेतला. मतमोजणीनंतर सर्व चार ग्रामपंचायतींमध्ये महिला सरपंच निवडून आल्या आहेत.अंतापूर ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पारूबाई मारोती राठोड, उपसरपंच प्रमेश्वर सुर्यवंशी,मुकादमगुडा ग्रामपंचायतीमध्ये सरपंच विमलबाई केशव जाधव,परमडोली ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पुष्पलता चरणदास राठोड व भोलापठार ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदी पार्बताबाई गणपत नाईक या महिलांच्या हाती सरपंच पदांची सुत्रे आली आहे.विशेष म्हणजे या ग्रामपंचायत मध्ये सरपंच व सदस्य पदाकरीता विजयी झालेल्या महिला पुरुष संपूर्ण मराठी भाषिक असुन बोलिभाषाही त्यांची मराठी आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या जिवती तालुक्यातील हि १४ गावे महाराष्ट्र राज्याचीच असल्याचा महत्त्वपूर्ण निर्वाळा झाला असला तरी सध्या तेलंगणा राज्याकडून या चार ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.दोन्ही राज्यांतील हा जुना सीमावाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

• सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार संपूर्ण १४ गावे महाराष्ट्र राज्याचीच आहेत असे असतानाही येथिल नागरिकांना दोन्ही राज्यांत मतदान करावे लागत आहे हे महाराष्ट्र सरकारचे दुर्देव

          – रामदास रणवीर,सामाजिक कार्यकर्ते मुकादमगुडा

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये