दगडवाडी येथे १५ इलेक्ट्रिक पोलवरील तार केले लंपास

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
दगडवाडी ते चिंचोली शिवारात उभारण्यात आलेल्या इलेक्ट्रीक पोलवरील तारांची मोठ्या प्रमाणात चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. एकूण १५ पोलवरील अंदाजे ₹१,३७,३९३ किंमतीची तार अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी ज्ञानेश्वर कैलास म्हस्के (वय ३४) हे ASHOKA BUILDCON LIMITED कंपनीकडून संबंधित भागात ८५ इलेक्ट्रीक पोल उभारणी व वायरिंगचे काम पाहत होते. ५ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजेपासून ६ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या दरम्यान दगडवाडी शिवारातील १५ पोलवरील तार अज्ञात चोरट्यांनी चोरी करून नेल्याचे त्यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.प्राथमिक तपासानुसार चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास पोलवरील तार कापून नेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम 303(2) बी.एन.एस. अंतर्गत गुन्हा नोंदविला. सदर प्रकरणात विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक ब्रम्हागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक ढाकणे करीत आहेत.



