ग्रामीण विकासासाठी {एनएसएस आणि रोटरी} यांचा संयुक्त सहभाग हा प्रभावी आणि शाश्वत उपाय — डॉ. राजश्री मार्कंडेवार

चांदा ब्लास्ट
कवठी (ता. सावली) येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, साओली यांच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विशेष शिबिरा अंतर्गत मोफत आरोग्य तपासणी व औषध वितरण शिबिर यशस्वीरीत्या पार पडले. या उपक्रमासाठी रोटरी क्लब चंद्रपूर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. ग्रामीण विकासासाठी ‘एनएसएस’ आणि रोटरी यांचा संयुक्त सहभाग हा प्रभावी आणि शाश्वत उपाय असल्याचे मत डॉ. राजश्री मार्कंडेवार यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात डॉ. राजश्री मार्कंडेवार यांनी ग्रामीण भागातील आरोग्य समस्या, स्वच्छता, प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा व युवकांच्या सामाजिक जबाबदारीवर प्रकाश टाकला. “NSS” सारख्या चळवळीमुळे विद्यार्थ्यांमध्ये सेवाभाव निर्माण होतो, तर रोटरीसारख्या संस्थांच्या सहकार्यामुळे उपक्रमांना व्यापक स्वरूप मिळते. अशा संयुक्त प्रयत्नांतूनच सशक्त व निरोगी ग्रामीण समाज घडू शकतो,” असे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी श्री. संदीप रामटेकें, अध्यक्ष, रोटरी क्लब चंद्रपूर यांनी आपल्या भाषणात रोटरी क्लबच्या सामाजिक बांधिलकीचा उल्लेख करत सांगितले की, “ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविणे ही काळाची गरज आहे. ‘एनएसएस’ स्वयंसेवकांचा उत्साह, शिस्त व सेवाभाव प्रेरणादायी असून भविष्यातही अशा उपक्रमांसाठी रोटरी क्लब सदैव सहकार्य करेल.”
यावेळी श्री. राजेश गन्नारपवार (सचिव, रोटरी क्लब चंद्रपूर), सौ. ज्योती रामटेकें, डॉ. गणेश राणे व श्री. सुमित बोढे यांनीही मनोगत व्यक्त करून उपक्रमाचे कौतुक केले.
या शिबिरात ग्रामस्थांची सर्वसाधारण आरोग्य तपासणी करून आवश्यक त्या मोफत औषधांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमाचा २०० पेक्षा अधिक नागरिकांना प्रत्यक्ष लाभ झाला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात ग्रामपंचायत कवठीच्या सरपंच सौ. कांता बोरकुटे यांचे विशेष योगदान लाभले. त्यांनी ग्रामस्थांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्यासाठी प्रोत्साहन देत कार्यक्रमासाठी आवश्यक ते सहकार्य केले.
कार्यक्रमासाठी ‘एनएसएस’ कार्यक्रम अधिकारी श्री. देविलाल वातIखेरे यांचे मार्गदर्शन लाभले. सूत्रसंचालन NSS स्वयंसेविका तनुजा शेंडे यांनी प्रभावीपणे केले. प्रास्ताविक NSS स्वयंसेवक साहिल गुंडावर यांनी मांडले, तर आभार प्रदर्शन ‘एनएसएस’ स्वयंसेविका सोनी राऊत यांनी केले.
या उपक्रमामुळे ग्रामीण भागात आरोग्यविषयक जनजागृती वाढून सामाजिक जबाबदारीची भावना अधिक दृढ झाल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.



