एकही बालक लसीकरणापासुन वंचित राहु नये – आयुक्त अकुनुरी नरेश
सिटी टास्क फोर्स समितीच्या बैठकीत निर्देश ; नियमित राबवली जाते लसीकरण मोहीम

चांदा ब्लास्ट
मनपा आरोग्य विभागाचे कामकाज व्यवस्थितरीत्या सुरू आहे,सर्व वैद्यकीय अधिकारी यांनी लसीकरण सत्रांना नियमित भेटी द्याव्या तसेच 0 ते 5 वर्षे वयोगटातील एकही बालक लसीकरणापासुन वंचित राहु नये यादृष्टीने आरोग्य विभागाने प्रयत्न करण्याचे निर्देश आयुक्त अकुनुरी नरेश यांनी दिले.
सिटी टास्क फोर्स समितीची आढावा बैठक गुरुवार २९ जानेवारी रोजी मनपा सभागृहात आयोजित करण्यात आली होती,त्यात ते बोलत होते. . बैठकीत वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नयना उत्तरवार,डॉ. अश्विनी भारत,डॉ.आरवा लाहिरी,डॉ.योगेश्वरी गाडगे,डॉ.शरयु गावंडे,डॉ.नेहा वैद्य,डॉ. जयश्री मालुसरे, डॉ अल्फीया खान, डॉ. समृद्धी वासनिक,डॉ नरेंद्र जनबंधु,डॉ. घोषणा कोराम, शारदा भुक्या, ग्रेस नगरकर उपस्थित होते.डॉ. अश्विनी भारत यांनी नियमित लसीकरण सत्राच्या आयोजनाचे पॉवर पॉईंट द्वारे सादरीकरण केले.
चंद्रपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे शहरातील बालकांचे आरोग्य सुरक्षित राखण्यासाठी नियमित लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबवली जाते. मुलांमध्ये लसीकरणाद्वारे प्रतिबंधित होणाऱ्या आजारांपासून (VPD) संरक्षण मिळावे, यासाठी ही महत्त्वाची आरोग्यसेवा पुरवली जात आहे. या मोहिमेचा मासिक आढावा आयुक्तांद्वारे घेतला जातो.
महानगरपालिका कार्यक्षेत्रातील 1 ते 7 शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून दरमहा 153 बाह्य लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात येते. याशिवाय, महिन्याच्या प्रत्येक बुधवारला आरोग्य केंद्रांमध्ये ANM सेविकांद्वारे लसीकरण सत्रे घेतली जातात. 0 ते 5 वर्षांपर्यंतच्या बालकांना, तसेच 10 आणि 16 व्या वर्षीच्या मुलांना व गरोदर मातांना आवश्यक लसी दिल्या जातात. या लसीकरणात बीसीजी,ओपीव्ही,एचबीव्ही, टीडी,पेंटा,रोटा,आयपीव्ही,पीसीव्ही,डीपीटी,एमआर,जेई यांसारख्या लसींचा समावेश असून, त्या पूर्णपणे मोफत दिल्या जातात.
लसीकरणासाठी आवश्यक लस व साहित्य शासन स्तरावरून प्राप्त होते. त्याची योग्य प्रकारे शीतसाखळी प्रणालीद्वारे (ILR) साठवणूक केली जाते. सत्राआधी आशा स्वयंसेविकांमार्फत वॉर्डांमध्ये घरोघरी सर्वेक्षण करून वंचित लाभार्थ्यांची यादी तयार केली जाते आणि त्यांना सत्राच्या दिवशी लस दिली जाते. महानगरपालिकेच्या या उपक्रमामुळे हजारो बालकांना आणि गर्भवती मातांना आरोग्यदायी जीवनाची संधी मिळत असून, शहरातील सार्वजनिक आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम होत आहे.
“नियमित लसीकरण ही केवळ आरोग्यसेवा नसून, आपल्या पुढच्या पिढीच्या सुरक्षित भविष्यासाठीची गुंतवणूक आहे. पालकांनी वेळेवर लसीकरण करून आपली मुले गंभीर आजारांपासून वाचवावीत. महानगरपालिका आरोग्य विभागाच्या सर्व कर्मचारी आणि आशा वर्कर्सच्या माध्यमातून ही मोहीम सातत्याने आणि जबाबदारीने राबविली जात आहे.” – अकुनुरी नरेश,आयुक्त,चंद्रपूर महानगरपालिका



