वनसंरक्षण अधिक सक्षम करण्यासाठी वनअधिकाऱ्यांचे शस्त्र प्रशिक्षण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
वनविभागाअंतर्गत वनांचे संरक्षण अधिक सक्षमपणे करण्याच्या दृष्टीने वनअधिकारी व कर्मचाऱ्यांना शस्त्रांचा पुरवठा करण्यात आला आहे. यामध्ये संरक्षण कामात कार्यरत वनपाल व वनरक्षक संवर्गातील अधिकाऱ्यांना एस.एल.आर. रायफल तर वनपरिक्षेत्र अधिकारी व त्यावरील संवर्गातील अधिकाऱ्यांना ९ एम.एम. पिस्तूल देण्यात आले आहे. या शस्त्रांचा सराव व प्रशिक्षण कार्यक्रम दि. २७ व २८ जानेवारी २०२६ रोजी भद्रावती येथील विजासन फायरिंग बट येथे पार पडला.
या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन मा. श्री आर. एम. रामानुजन, मुख्य वनसंरक्षक, चंद्रपूर वनवृत्त, चंद्रपूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मा. श्री योगेश वाघाये, उपवनसंरक्षक, मध्यचांदा वनविभाग, श्री राजन तलमले, विभागीय वनाधिकारी, चंद्रपूर वनविभाग, मा. श्री विकास तरसे, सहाय्यक वनसंरक्षक, चंद्रपूर, मा. श्री आदेश शेंडगे, सहाय्यक वनसंरक्षक, मध्यचांदा तसेच मा. श्री मंगेश गिरडकर, सहाय्यक वनसंरक्षक प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
दि. २७ जानेवारी रोजी सकाळच्या सत्रात वनविभागाअंतर्गत प्रचलित वनकायद्यांबाबत वनअधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर पोलिस विभाग, चंद्रपूर येथील शस्त्रागार अधिकारी श्री प्रशांत बागडी व त्यांच्या पथकाकडून शस्त्रांची ओळख, माहिती, शस्त्र उघडणे व पुन्हा जोडणे तसेच शस्त्र चालविण्याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. दुपारच्या सत्रात मा. अॅड. श्री वेणुगोपाल, विधी सल्लागार, चंद्रपूर वनवृत्त, चंद्रपूर यांनी शस्त्र बाळगणे व वापर याबाबतच्या वैध व अवैध बाबींवर सविस्तर मार्गदर्शन केले.
दि. २८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी एस.एल.आर. रायफल व ९ एम.एम. पिस्तूलद्वारे गोळीबाराचा सराव घेण्यात आला. या सरावात उपवनसंरक्षक व विभागीय वनाधिकारी यांच्यासह सहाय्यक वनसंरक्षक दर्जाचे ३ अधिकारी, वनपरिक्षेत्र अधिकारी २३, वनपाल २३, वनरक्षक ७८ व प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला. पिस्तूलने प्रत्येकी १० गोळ्या तर एस.एल.आर. रायफलने वनपाल व वनरक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांनी प्रत्येकी ५ गोळ्या झाडून सराव केला. या प्रशिक्षणामुळे वनअधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढेल व वनसंरक्षण कार्य अधिक प्रभावी होईल, असे मत उपस्थित अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
या प्रशिक्षणात चंद्रपूर, ब्रह्मपुरी व मध्यचांदा वनविभागातील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री जितेंद्र एकनाथ देवगडे, वनरक्षक, चिपराळा यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन श्री किरण वासुदेव धानकुटे, वनपरिक्षेत्र अधिकारी, भद्रावती तसेच श्री जी. ए. ठाकूर, वनपरिक्षेत्र अधिकारी (संरक्षण पथक), चंद्रपूर व त्यांच्या पथकाने केले. आभार प्रदर्शन श्री किरण वासुदेव धानकुटे, वनपरिक्षेत्र अधिकारी, भद्रावती यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी भद्रावती वनपरिक्षेत्रातील सर्व क्षेत्र सहाय्यक श्री व्ही. व्ही. शिंदे, श्री ए. बी. शेळकी, श्री व्ही. आर. ठाकरे यांच्यासह सर्व वनरक्षक, कार्यालयीन कर्मचारी तसेच कायमस्वरूपी व हंगामी वनमजुरांनी परिश्रम घेतले.



