पुढे ढकललेल्या निवडणुकीतील उमेदवारांच्या खर्चावर तात्काळ दिलासा द्या
खा. धानोरकर यांची निवडणूक आयोगाकडे ११ डिसेंबरनंतरचाच खर्च ग्राह्य धराण्याची मागणी

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर :– महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (नगर परिषद व नगर पंचायत) निवडणुका न्यायालयीन प्रक्रियेमुळे पुढे ढकलल्या गेल्याने, उमेदवारांच्या निवडणूक खर्चाचे व्यवस्थापन एक कळीचा मुद्दा बनले आहे. या पार्श्वभूमीवर, खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मुख्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग यांच्याकडे एक अत्यंत महत्त्वपूर्ण मागणी केली आहे. उमेदवारांना आर्थिक ताणातून दिलासा देण्यासाठी, निवडणूक खर्चाची गणना नवीन वेळापत्रकानुसार निवडणूक चिन्ह वाटपाच्या दिवसापासून (११ डिसेंबर) सुरू करावी, अशी स्पष्ट भूमिका खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मांडली आहे. यापूर्वी झालेला सर्व खर्च निवडणूक खर्च म्हणून ग्राह्य धरू नये, अशी त्यांची आग्रही विनंती आहे.
खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मुख्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग, मुंबई यांना पत्र लिहून, सध्याच्या न्यायालयीन प्रक्रिया व निवडणूक आयोगाच्या आदेशामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकांमधील उमेदवारांच्या खर्चाबाबत स्पष्ट मार्गदर्शक सूचना जारी करण्याची विनंती केली आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पत्रात नमूद केले आहे की, मा. न्यायालयीन प्रक्रिया व आयोगाच्या आदेशानुसार, ज्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत, त्यासाठी उमेदवारांनी यापूर्वी केलेला सर्व खर्च हा निवडणूक खर्च म्हणून ग्राह्य धरू नये. उमेदवारांवर अनावश्यक आर्थिक ताण पडू नये आणि निवडणुकीत समान संधी मिळावी यासाठी, निवडणुकीच्या नवीन वेळापत्रकानुसार दिनांक ११ डिसेंबर रोजी निवडणूक चिन्हांचे वाटप होणार आहे.
खासदार प्रतिभा धानोरकर यांची मागणी आहे की, ११ डिसेंबर रोजी निवडणूक चिन्ह वाटप झाल्यानंतर, त्या दिवसापासून उमेदवारांनी केलेला प्रत्येक खर्च हा निवडणूक खर्च म्हणून ग्राह्य धरण्यात यावा, तर या तारखेपूर्वी झालेला खर्च कोणत्याही परिस्थितीत ग्राह्य धरला जाऊ नये. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी या अतिशय महत्त्वाच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून, संबंधित जिल्हाधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी आणि निवडणुकीतील उमेदवार यांना या संदर्भात स्पष्ट आणि त्वरित मार्गदर्शक सूचना त्वरित निर्गमित करण्यात याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.



