‘त्रिशंकु’ सरकारच्या वर्षपूर्तीवर खासदार प्रतिभा धानोरकर यांची तोफ
"संतभूमी महाराष्ट्राचे 'तीन तिघाडा, काम बिघाडा' मध्ये रूपांतर

चांदा ब्लास्ट
महाराष्ट्र राज्यात ‘दोन पक्ष फोडून’ स्थापन झालेल्या वर्तमान सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर, खासदार प्रतिभा धानोरकर यांनी राज्य सरकारच्या कामगिरीवर जोरदार टीका केली आहे. ‘संतभूमी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्राचे चित्र गेल्या वर्षभरात अत्यंत निराशाजनक झाले असून, राज्याचे जगासमोर ‘तीन तिघाडा आणि महाराष्ट्राचे काम बिघाडा’ असे लाजिरवाणे झाले आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी केली आहे.
खासदार प्रतिभा धानोरकर यांनी म्हटले आहे की, एकीकडे महाराष्ट्र सुजलाम सुफलाम आहे, मात्र सध्या राज्यातील शेतकरी पूर्णपणे संकटात सापडले आहेत आणि राज्याची घडी पूर्णपणे मोडलेली आहे. “राज्यात कायद्याची आणि सुव्यवस्थेची स्थिती इतकी बिघडली आहे की, राज्यातील महिलांना निवडणूक अर्ज भरण्यासाठीसुद्धा बंदूकधारी घेऊन जावे लागते, ही बाब अत्यंत दुर्दैवी आणि लाजिरवाणी आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
“या एका वर्षात सरकारने दोन प्रमुख पक्ष फोडून हे सरकार बनवले. पण या सत्तासंघर्षातून आणि पक्षफोडीच्या राजकारणातून सामान्य नागरिकांसाठी काय साध्य केले आहे?” असा थेट प्रश्न खासदार प्रतिभा धानोरकर यांनी उपस्थित केला आहे. केवळ सत्ताकारणासाठी धडपडणाऱ्या या सरकारने महाराष्ट्राची प्रतिमा आणि प्रगती दोन्ही धोक्यात आणले आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
खासदार प्रतिभा धानोरकर यांनी या सरकारला आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला देत, त्वरित राज्याच्या मूलभूत समस्यांवर आणि शेतकरी व महिलांच्या सुरक्षेवर लक्ष केंद्रित करण्याची मागणी केली आहे.



