घुग्घुसमध्ये जागतिक दिव्यांग दिनानिमित्त प्रहार जनशक्ती पक्षाचा हृदयस्पर्शी सन्मान सोहळा
चांदा ब्लास्ट
घुग्घुस : जागतिक दिव्यांग दिनानिमित्त घुग्घुस शहरात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने एक हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. समाजातील प्रत्येक घटकाप्रती सामाजिक बांधिलकी जपत दिव्यांग बांधवांचा सन्मान करण्याचा हा उपक्रम उपस्थितांच्या मनाला स्पर्शून गेला.
दि. ०३ डिसेंबर २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. या सोहळ्यास प्रहार जनशक्ती पक्षाचे अमोल नथ्थुजी मांढरे अध्यक्षस्थानी होते. गावातील दिव्यांग बांधवांना शॉल, लाडू आणि छोटेखानी भेटवस्तू देत त्यांचा सन्मान करण्यात आला. सन्मान स्वीकारताना त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि आत्मविश्वास पाहून उपस्थितांमध्ये संवेदनशीलतेचा आणि ऐक्याचा संदेश पोहोचला.
या कार्यक्रमास अमोल नथ्थुजी मांढरे यांच्यासह इरफान शेख, सुभाष मांढरे, पवन निशाद, शारदा संजय झाडें, संजना ढोरके, महेश कामतवार, दिव्यांग बांधव गणेश कामतवार, अतुल सोंडुले, देवराव नारायण बंडेवार, इरशाद खान, असरार अहमद सिद्दीकी, रिजवान अंसारी, बिलकीश बानो, जन्नत खातुल शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
दिव्यांग बांधवांच्या सन्मानातून “समाजाची खरी ताकद एकजुटीत आहे” हा प्रभावी संदेश देण्यात आला. प्रहार जनशक्ती पक्षाच्या या उपक्रमामुळे गावात सामाजिक ऐक्य, संवेदना आणि सकारात्मकतेचा नवा आदर्श निर्माण झाला आहे. असे उपक्रम दिव्यांग बांधवांना आधार, प्रोत्साहन देत त्यांच्या पुढील वाटचालीस नवचैतन्य प्रदान करतात.



