ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव राजा पंचायत समितीत जीएसटी-७ प्रकरणावरून खळबळ

विवरणपत्र सादरीकरणातील अनियमिततेचा आरोप; जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा पंचायत समितीतील स्त्रोतावर कर कपात विवरणपत्र (जीएसटी-७) सादरीकरणात गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप करत संबंधित अधिकाऱ्यांची प्रशासकीय व फौजदारी जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात श्रीमंत राजे लखुजीराव जाधवराव गड किल्ले ऐतिहासिक वास्तू संवर्धन प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले आहे.

प्रतिष्ठानचे सचिव अतिश राजे जाधव यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, आर्थिक वर्ष २०२३-२४ पासून आजपर्यंत पंचायत समिती देऊळगाव राजा येथे स्त्रोतावर कर कपात विवरणपत्र (जीएसटी-७) कायद्यानुसार निर्धारित कालमर्यादेत सादर करण्यात आले आहे की नाही, याबाबत गंभीर शंका निर्माण झाली आहे. विवरणपत्र वेळेत न सादर करणे हे केवळ प्रशासकीय त्रुटी नसून वैधानिक कर्तव्याचे उल्लंघन असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

या संभाव्य उल्लंघनामुळे शासनावर व्याज व दंडाचा आर्थिक भार पडण्याची शक्यता असून सार्वजनिक निधीचे नुकसान होऊ शकते, असा दावा निवेदनात करण्यात आला आहे. तसेच कर अनुपालनासंदर्भातील जबाबदारी निश्चित करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

गटविकास अधिकाऱ्यांच्या एकूण नियंत्रणाखाली पंचायत समितीचे आर्थिक कामकाज होत असल्याने त्यांच्या भूमिकेची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्याची गरज असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यासाठी विशेष लेखापरीक्षण, जबाबदारी निश्चिती, शिस्तभंग कारवाई, आर्थिक नुकसानाची वसुली आणि आवश्यकतेनुसार फौजदारी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, या निवेदनाच्या प्रती जिल्हा परिषद बुलढाणा येथील मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच राज्य कर आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांनाही पाठविण्यात आल्या आहेत. या प्रकरणी प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये