चिरादेवी शाळेतल्या मुलांनी मराठी नभातील चमकते तारे या हस्तलिखित पुस्तकाची केली सुंदर निर्मिती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती :- दि. २८ फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन व मराठी भाषा गौरव दिनानिमित्त भद्रावती तालुक्यातील चिरादेवी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत विविध उपक्रम राबवण्यात आले. विशेष म्हणजे तालुक्यातील हि शाळा आपल्या सातत्यपूर्ण अभिनव उपक्रमातून नव नवे प्रयोग करीत असते. पंचायत समिती भद्रावती अंतर्गत या शाळेने अनेक नामांकने पटकावली आहेत. शाळा व गावकरी, शिक्षक असा सुरेख संगम या शाळेने साधला असल्याने विद्यार्जनासह इथला विद्यार्थी स्पर्धा , क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात सतत चमकत असतात.
पार पडलेल्या कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या विज्ञान मॉडेल प्रदर्शनीचे मान्यवरांचे हस्ते उद्घाटन करून व ज्ञानेश्वरांच्या ग्रंथांचे पूजन करून करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष झाडी बोली साहित्य संघाचे साहित्यिक शालिक दानव तर प्रमुख अतिथी म्हणून विस्तार अधिकारी स्वाती महाजन, क्षितिज शिवरकर, वाघदारकर, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रवींद्र कोगरे, निरुपला मेश्राम, राजू वासेकर, प्रदीप देवतळे, बंडू जोगी, चंदू ताजणे आदींचा सहभाग लाभला.
सकाळी गावातून लेझीम टाळ गजरात दिंडी काढण्यात आली. कार्यक्रमाचे विशेष आकर्षक म्हणजे शाळेत निर्मित केलेली गांधीजींची कुटी, मुलांनी साकारलेले ऐतिहासिक किल्ले, मराठी नभातील चमकते तारे या मुलांच्या हस्तलिखितांचे पुस्तक निर्मिती होती..
मुलांच्या पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाल्यानंतर अनेक बालकवींनी आपल्या कविता सादर केल्या आणि उपस्थिती प्रेक्षकांच्या टाळ्या घेतल्या.
अध्यक्षीय भाषणामध्ये शालिक दानव यांनी शाळेमध्ये राबवण्यात येत असणाऱ्या विविध उपक्रमाबद्दल मुलांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या आणि चिरादेवी गावातील या शाळेतून घडलेले विद्यार्थी शास्त्रज्ञ, कोणी साहित्यिक, चित्रकार, तर कोणी देशसेवक होतील हे मी आजच्या प्रसंगी सांगतो आहे कारण विविध उपक्रमातून मुलांचे पाय पाळण्यात दिसते आहे. त्यासाठी माझा या सर्व लाडक्यांना शुभ आशीर्वाद आहे. असे गौरव उद्गार काढले.
उद्घाटनिय भाषणामध्ये स्वाती महाजन यांनी विद्यार्थ्यांशी संवादात्मक प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये विद्यार्थ्यांना बोलते केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक वागदरकर, उत्कृष्ट संचालन अजय मुसळे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नीता डाकरे, संध्या भडके आणि विद्यार्थ्यांनी खूप परिश्रम घेतले.



