ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बांबू कारागीर व कामगारांना उद्योग उभारण्यासाठी चंद्रपूरात बीआयडीसी स्थापन करा – आ. जोरगेवार

अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना केली मागणी

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :_ येथे एमआयडीसीच्या धर्तीवर, वन विभागाच्या उपलब्ध जागेवर बीआयडीसी (बांबू इंडस्ट्री डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) स्थापन करण्याची मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी सभागृहात बोलताना केली आहे. या माध्यमातून बांबू कारागीर व कामगारांना उद्योग उभारण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, अत्याधुनिक तंत्रज्ञान, सुलभ कर्जसुविधा, बाजारपेठेपर्यंत थेट संपर्क तसेच दर्जेदार प्रशिक्षण उपलब्ध करून दिल्यास चंद्रपूर हे केवळ उत्पादन केंद्र न राहता एक सक्षम ‘बांबू इंडस्ट्री हब’ म्हणून उदयास येऊ शकते, असे ते यावेळी म्हणाले.

यावेळी अधिवेशनात बोलताना ते म्हणाले की, बांबू ही सोन्याची काठी आहे. त्यामुळे बांबू आधारित उद्योगांना चालना मिळाल्यास स्थानिक युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मितीची संधी उपलब्ध होईल, पारंपरिक कौशल्याला नवे व्यासपीठ मिळेल आणि अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल. हा उपक्रम महाराष्ट्रासाठीच नव्हे, तर देशात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही आदर्श ठरणारा, नाविन्यपूर्ण आणि पहिला प्रयोग ठरू शकतो, असा दृढ विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

बांबू कारागिरांना कलावंत म्हणून संबोधित करण्यात येत आहे. त्यामुळे समाज कल्याण विभागाच्या धर्तीवर बांबू कलावंतांसाठीही मानधन योजना सुरू करण्यात यावी. विशेषतः वृद्ध बांबू कारागीर व कलावंतांना मासिक मानधन देण्याची योजना अस्तित्वात आहे का, अथवा ती सुरू करण्याचा सरकारचा विचार आहे का, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. पर्यावरणाचा विचार करता आता बांबूपासून तयार होणाऱ्या शोभेच्या वस्तूंना प्राधान्य देणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.

यासोबतच वन विभागाकडे असलेली अतिरिक्त जमीन बांबू लागवडीसाठी बुरुड समाजातील बांबू कारागिरांना उपलब्ध करून देण्याबाबत सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणीही त्यांनी सभागृहात केली. या सर्व विषयांवर वनमंत्री गणेश नाईक यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यापुढे बांबू कारागिरांना उत्तम दर्जाचाच बांबू उपलब्ध करून दिला जाईल, अशी हमी वनमंत्र्यांनी अधिवेशनात बोलताना दिली.बांबू उद्योगाच्या माध्यमातून समाजातील कारागिरांना बळकटी देत चंद्रपूरला औद्योगिक आणि रोजगाराच्या नव्या उंचीवर नेण्याचा हा प्रयत्न निश्चितच यशस्वी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये