चंद्रपूर कॅन्सर रुग्णालय आता ‘पंडित दीनदयाल उपाध्याय’ नावाने ओळखले जाणार
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या आग्रही पाठपुराव्याला मुख्यमंत्र्यांनी दिली मान्यता

चांदा ब्लास्ट
२८० कोटींचा अत्याधुनिक कॅन्सर रुग्णालय प्रकल्प जनसेवेसाठी सज्ज
चंद्रपूर :_
जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रात ऐतिहासिक ठरणाऱ्या २८० कोटी रुपयांच्या अत्याधुनिक कॅन्सर रुग्णालयाला ‘पंडित दीनदयाल उपाध्याय कॅन्सर रुग्णालय’ असे नाव देण्यास मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. आज विधानभवनातील मुख्यमंत्री कार्यालयात राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या रुग्णालयाला पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे नाव देण्याची आग्रही मागणी केली. या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तत्काळ संमती दर्शवली असून आता हे रुग्णालय अधिकृतपणे ‘पंडित दीनदयाल उपाध्याय कॅन्सर रुग्णालय’ या नावाने ओळखले जाणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्याच्या आरोग्य सुविधांना नवे परिमाण देणारा २८० कोटींचा १४० खाटांचा कॅन्सर रुग्णालय प्रकल्प लवकरच जनसेवेसाठी उपलब्ध होणार आहे. टाटा ट्रस्ट यांच्या विशेष सहकार्यातून सहकार्यातून उभारलेले हे अत्याधुनिक रुग्णालय पूर्वविदर्भातील आदिवासी, ग्रामीण आणि सर्वसामान्य लोकांसाठी जीवदानाचा नवा आशादायी केंद्रबिंदू ठरणार आहे.
अर्थमंत्री, वनमंत्री, सांस्कृतिक कार्यमंत्री आणि पालकमंत्री म्हणून कार्यरत असताना आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या दूरदृष्टी, सततच्या प्रयत्न आणि विकासाभिमुख कार्यपद्धतीतून साकारलेला हा सर्वात मोठा आरोग्य प्रकल्प पूर्वविदर्भासाठी ‘नवजीवनाचा आशादायी प्रकाश’ देणारा ठरणार आहे. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी २०१४ पासून या प्रकल्पासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. २०१८ मध्ये शासन निर्णयानंतर उभारणीला गती मिळाली आणि आज हे केंद्र पूर्णत्वास आले आहे. येत्या २२ डिसेंबर रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मा.मोहनजी भागवत व राज्याचे मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन होणार असून पूर्व विदर्भासाठी हे रुग्णालय महत्वाचा मैलाचा दगड ठरणार आहे.
रुग्णालयाची वैशिष्ट्ये
तळमजला + ४ मजले : १,००,०००+ चौ. फूट बांधकाम,१४० बेडचे अत्याधुनिक कॅन्सर उपचार केंद्र,Linear Accelerators (२), ब्रेकीथेरपी, मॅमोग्राफी, 3D/4D अल्ट्रासाऊंड, डिजिटल एक्स-रे,केमोथेरपी, सर्जिकल ऑन्कोलॉजी, प्रगत प्रयोगशाळा अत्याधुनिक सुविधा या रुग्णालयात उपलब्ध आहे.
जिल्ह्यातील आरोग्य क्षेत्राला नवे आयाम
चंद्रपूर जिल्ह्यातील आरोग्य क्षेत्राला नवा आयाम देणाऱ्या आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून मेडिकल कॉलेज, १४ प्राथमिक आरोग्य केंद्रे, नवे ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय श्रेणीवृद्धी, स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रे यांसह अनेक प्रकल्प पूर्णत्वास आले आहेत. या सर्व प्रयत्नांचा सर्वोच्च टप्पा म्हणून कॅन्सर रुग्णालयाची उभारणी जिल्ह्यासाठी ऐतिहासिक ठरणार आहे.
कॅन्सर हॉस्पिटलसाठी सातत्याने पाठपुरावा
जिल्हा खनिज विकास प्रतिष्ठान, राज्य शासन आणि टाटा ट्रस्ट यांच्या विशेष सहकार्याने २८० कोटी रुपयांत उभारलेले हे भव्य कॅन्सर रुग्णालय आज पूर्णत्वास आले आहे.आ. सुधीर मुनगंटीवार यांनी २०१४ पासून कॅन्सर रुग्णालय स्थापनेसाठी सातत्याने पाठपुरावा केला. १७ एप्रिल २०१८ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत चंद्रपूर येथे अत्याधुनिक कॅन्सर रुग्णालय उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला आणि २६ जून २०१८ रोजी शासन निर्णय प्रकाशित झाला. आता आ.सुधीर मुनगंटीवार यांच्याच पुढाकारामुळे या रुग्णालयाला पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे नाव देण्यात येणार आहे, हे विशेष.



