आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे मोरवा विमानतळाच्या आधुनिकीकरणासाठी १७ कोटींची मान्यता
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिली मंजुरी

चांदा ब्लास्ट
मोरवा विमानतळ आधुनिकीकरण आणि सुरक्षाविषयक सुविधा उभारणीचा मार्ग मोकळा
चंद्रपूर :- राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून चंद्रपूर जिल्ह्यातील मोरवा विमानतळाच्या आधुनिकीकरण, सुरक्षाविषयक सुविधांच्या उभारणी आणि नूतनीकरणासाठी आवश्यक असलेला ₹१७ कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी तत्काळ मंजूर केला आहे. आज विधानभवनातील मुख्यमंत्री कार्यालयात झालेल्या भेटीत आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी विमानतळाच्या सुरक्षाविषयक अडचणी आणि उडान क्लबच्या प्रशिक्षणासाठी आवश्यक सुविधांबाबत सविस्तर माहिती देत निधीची मागणी केली. आ.मुनगंटीवार यांच्या आग्रही मागणीला प्रतिसाद देत मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्वरित मंजुरी दर्शवली आहे.
मोरवा विमानतळ परिसरात वैमानिक प्रशिक्षण संस्था म्हणून नागपूर उडान क्लब, भारत सरकारच्या नागरी विमान संचालनालयाच्या (DGCA) मान्यतेनुसार कार्यरत आहे. या ठिकाणी सुरक्षित, आधुनिक आणि नियमांनुसार विमान संचालनासाठी सुरक्षाविषयक व मूलभूत सुविधांची उभारणी अनिवार्य आहे. यासाठी आवश्यक असलेल्या महत्त्वपूर्ण कामांबाबत आज आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन सादर केले.
DGCA च्या नियमांनुसार पुढील अत्यावश्यक सुविधांची उभारणी आवश्यक असून परिमिती तपासणी मार्गाचे बांधकाम,विमानतळाभोवती उपलब्ध संरक्षण भिंतीची उंची वाढविणे, हँगर व फ्युएल स्टोरेजपर्यंत जाण्यासाठी सुरक्षित संपर्क मार्ग,विमानतळाच्या चारही दिशांना सुरक्षा देखरेख टॉवरचे बांधकाम,मुख्य इमारतीसमोरील भागात हाय-मास्ट प्रकाशयोजना,स्वागत द्वार, गार्ड रूम, पार्किंग व्यवस्था आणि रेस्ट हाऊस उभारणी या सर्व कामांसाठी एकूण ₹१७ कोटी निधीची मागणी केली. विमान सुरक्षेचे महत्त्व आणि उडान क्लबच्या प्रशिक्षणाच्या दृष्टीने आवश्यक असलेली कामे तातडीची असल्याचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या प्रस्तावाला संपूर्ण सकारात्मकता दाखवत ₹१७ कोटींच्या निधीस त्वरित मंजूरी दिली.
मोरवा विमानतळाचे आधुनिकीकरण, विस्तारीकरण आणि सुरक्षा मजबूत करण्याच्या या निर्णयामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील विमान प्रशिक्षण आणि विमानचालन क्षेत्राला नवे बळ मिळेल, असे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी नमूद करत मुख्यमंत्री महोदयांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.



