पुण्यातील कला संस्कार आर्ट स्टुडिओत तयार होणार चंद्रपूरातील शिवरायांचा अश्वारूढ पुतळा
आमदार किशोर जोरगेवार यांची कला केंद्राला भेट

चांदा ब्लास्ट
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे लोकवर्गनितून उभारण्यात येणार असलेल्या साडेबारा फूट उंचीच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याच्या कामाला वेग आला आहे. हा पुतळा पुणे येथील प्रसिद्ध कला संस्कार आर्ट स्टुडिओ मध्ये तयार केला जाणार असून बुधवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी स्टुडिओला भेट देत प्रत्यक्ष कामाचा आढावा घेतला. यावेळी स्टुडिओचे संस्थापक व संचालक महेंद्र थोपते यांच्यासोबत स्मारकाबाबत सविस्तर चर्चा झाली.
छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवस्मारक उभारण्याची शिवप्रेमींची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. ही भावना ओळखून आमदार जोरगेवार यांनी स्वतः पुढाकार घेऊन महानगर पालिका प्रसासना सोबत बैठका घेत स्मारक उभारणीची प्रक्रिया गतीमान केली आहे. या संदर्भातील प्रशासकीय मंजुरींची बहुतेक कामे पूर्ण झाली असून उर्वरित तांत्रिक बाबी तातडीने निकाली काढण्याचे निर्देश त्यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत. येथील जागा ५८ लक्ष रुपयात मापालीका प्रसासनाने जिल्हा प्रशासनाकडून विकत घेतली असून सदर पैसेही वर्ग करण्यात आले आहे.
शिवस्मारकाची निर्मिती पुण्यातील कला संस्कार आर्ट स्टुडिओकडे सोपवावी, अशी शिवभक्तांची इच्छा होती. त्यानुसार सदर कला केंद्राला ५ लक्ष रुपयांची प्राथमिक रक्कम अदा करण्यात आली आहे. आज झालेल्या भेटीदरम्यान स्मारकाची रूपरेषा, शिल्पाची गुणवत्ता, वापरल्या जाणाऱ्या साहित्याची निवड आणि निर्मितीची वेळावधी याबाबत सखोल चर्चा आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे. थोपते यांच्या स्टुडिओने यापूर्वीही छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर, संत-भगवंंत तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य स्मारके तयार केली आहेत.
चंद्रपूरात उभारल्या जाणाऱ्या या साडेबारा फूट उंचीच्या भव्य अश्वारूढ पुतळ्यामुळे शहराचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक सौंदर्य वाढणार असून शिवप्रेमींचे स्वप्न साकार होणार आहे, असे आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले.



