राज्यस्तरीय गीता स्पर्धेत चंद्रपूरच्या अंबर राठीचा गौरव — “प्रोत्साहन पुरस्कार” प्राप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
चिन्मय मिशन या संस्थेतर्फे पुणे येथे आयोजित भगवद्गीता अध्याय १५ (पुरुषोत्तम योग) या राज्यस्तरीय स्पर्धेत चंद्रपूरची पाच वर्षीय अंबर राठी हिने उल्लेखनीय कामगिरी करीत “प्रोत्साहन पुरस्कार” प्राप्त केला.
या स्पर्धेचा उद्देश बालकांमध्ये गीतेतील मूल्ये, नैतिकता आणि आत्मविकासाची भावना रुजविणे हा होता. या उपक्रमात राज्यभरातून एकूण ६६ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता, त्यापैकी केवळ १२ स्पर्धकांना प्रोत्साहन पुरस्कार प्रदान करण्यात आले.
अंबर राठी, ही श्री अर्जुन राठी व सौ. श्वेता राठी यांची कन्या असून, केवळ पाच वर्षांच्या वयात तिने आपल्या ज्ञान, आत्मविश्वास आणि अध्यात्मिक जाणिवेच्या जोरावर ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
चंद्रपूर शहर तसेच माहेश्वरी समाजात अंबर राठीच्या या यशाबद्दल आनंद व्यक्त करण्यात येत असून, सर्वत्र तिच्या बुद्धिमत्तेची आणि आत्मविश्वासाची प्रशंसा होत आहे.
					
					
					
					
					


