देऊळगाव राजात त्या बॅनरवरून संतापाची लाट
डॉ. रामप्रसाद शेळके यांच्ये कार्यकर्ते आक्रमक

चांदा ब्लास्ट
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या बुलढाणा जिल्हा अध्यक्षपदी नरेश शेळके यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. या निमित्ताने देऊळगाव राजा शहरात अभिनंदनार्थ लावण्यात आलेल्या बॅनरने आता राजकीय वादाला तोंड फुटले आहे. कारण या बॅनरमध्ये पक्षाचे ज्येष्ठ नेते, सहकार क्षेत्रातील प्रभावी व्यक्तिमत्त्व आणि जिल्ह्यातील माजी पदाधिकारी शिक्षणमहर्षी डॉ. रामप्रसाद शेळके यांचा फोटो नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी उसळली आहे.
या घटनेमुळे देऊळगाव राजा तालुक्यापासून ते संपूर्ण सिंदखेड राजा मतदारसंघात संतापाची लाट उसळली आहे. अनेक कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया नोंदवत पक्षातील काही व्यक्तींवर ‘जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याचा’ आरोप केला आहे. डॉ. शेळके यांना युवकांचा प्रचंड पाठिंबा असून, सहकार क्षेत्रातील त्यांचा प्रभाव आजही कायम आहे. अशा नेत्याला बॅनरमधून वगळल्याने कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या असल्याचे मत व्यक्त होत आहे.
या घटनेनंतर पक्षांतर्गत फूट पडल्याचे संकेत मिळत असून, आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषद निवडणुकांवर याचा परिणाम होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. देऊळगाव राजा शहरातील तसेच तालुक्यातील काही पदाधिकारी आणि जबाबदार कार्यकर्त्यांनाही या बॅनर प्रकरणात डावलण्यात आल्याची चर्चा रंगली आहे.
स्थानिक कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, सध्या पक्षात संवादाचा अभाव दिसून येत असून, कुठल्याही बैठकीसाठी किंवा कार्यक्रमासाठी त्यांना विश्वासात घेतले जात नाही. त्यामुळे पक्षाच्या एकीवर आणि संघटनेच्या स्थैर्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर वरिष्ठ नेत्यांनी तत्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणावी, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. अन्यथा आगामी निवडणुकांमध्ये या फूटिचा मोठा फटका बसू शकतो, असा इशारा अनेकांनी दिला आहे.दरम्यान, या वादावर अद्याप पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नसून, वादग्रस्त बॅनर लावणाऱ्या कार्यकर्त्यांवर कारवाई होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
					
					
					
					
					


