पांढरकवड्यात साजरी होणार देव दीपावली
श्रीराम–जानकी कल्याणोत्सव आणि दीपोत्सवाचा भव्य सोहळा ५ नोव्हेंबरला

चांदा ब्लास्ट
पांढरकवडा (चंद्रपूर) : श्री क्षेत्र पांढरकवडा येथील स्वयंभू पवित्र पंचमुखी हनुमान मंदिर परिसरात कार्तिक पौर्णिमेच्या पावन निमित्ताने यंदाही देव दीपावलीचा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे. भगवान श्रीरामचंद्रजी व माता भगवती जानकी यांच्या कल्याणोत्सव (श्रीराम–जानकी विवाह) तसेच दीपोत्सवाचा दिव्य कार्यक्रम बुधवार, ५ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत संपन्न होणार आहे.
हा पवित्र उत्सव देवतांप्रमाणेच सर्व भक्तजनांना आनंदित करणारा आणि मंगलकामनेला समर्पित असा आहे. या प्रसंगी सुंदरकांड पठण, कल्याणोत्सव, दीपोत्सव, महाआरती तसेच प्रसाद वितरणाचे विशेष आयोजन करण्यात आले आहे.
आयोजक समितीने सर्व श्रद्धाळू, भक्तगण आणि नगरवासीयांना आवाहन केले आहे की, त्यांनी आपल्या कुटुंबिय व मित्रांसह या पवित्र सोहळ्यात सहभागी होऊन पुण्यलाभ घ्यावा आणि दीपावलीचा हा दिव्य उत्सव आनंदाने साजरा करावा.
					
					
					
					
					


