भजनातून जागवा श्रद्धा, संस्कार आणि एकतेचा प्रकाश – आ. सुधीर मुनगंटीवार
आ. मुनगंटीवार यांनी केली निवडणूक काळात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता

चांदा ब्लास्ट
१८० भजन मंडळांना साहित्य वितरणाचा तिसरा टप्पा यशस्वी
बल्लारपूर शहर व ग्रामीण भागातील भजन मंडळांना भजन साहित्य वाटपाचा उपक्रम
चंद्रपूर – भजनातून समाजात श्रद्धा, संस्कार आणि एकतेचा प्रकाश जागविण्याच्या उद्देशाने राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून बल्लारपूर शहर आणि ग्रामीण भागात भजनसाहित्य वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. तुकाराम सभागृह येथे झालेल्या या कार्यक्रमात “भजन ही मनाची साधना असून त्यातून चित्तशांती आणि समाधान लाभते,” असा भाव त्यांनी व्यक्त केला. निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करताना १८० भजन मंडळांना साहित्य वितरणाचा तिसरा टप्पा यशस्वीपणे पूर्ण झाल्याचा आनंद होत असल्याचेही आ. श्री. मुनगंटीवार यांनी नमूद केले.
बल्लारपूर येथील तुकाराम सभागृह येथे बल्लारपूर शहर व ग्रामीण भागातील भजन मंडळांना भजन साहित्य वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यावेळी आ. श्री. मुनगंटीवार बोलत होते. यावेळी वनविकास मंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, शहर अध्यक्ष रणंजय सिंग, रामपाल सिंग, पिंटू देऊळकर, निलेश खरबडे, किशोर पंदिलवार, श्रीनिवास जंगमवार, श्री. द्विवेदी, रेणुकाताई दुधे, वैशालीताई जोशी, विद्याताई देवाळकर, समीर केने, काशी सिंग, मनीष पांडे, वैशालीताई बुद्धलवार आदींची उपस्थिती होती.
आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, सर्वांच्या आशीर्वादाने व सहकार्याने मतदार संघात कार्य करण्याची संधी मिळाली. निवडणूक काळात दिलेला शब्द पूर्ण करत १८० भजन मंडळांना साहित्य वाटपाचा तिसरा टप्पा यशस्वीरीत्या आज पार पडला. याचे मला कमालीचे आत्मिक समाधान आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी दाखविलेला जीवनमार्ग सदैव प्रेरणादायी आहे. नागपूर विद्यापीठाला त्यांचे नाव देण्याचे सौभाग्य आणि मोझरी येथील त्यांच्या ट्रस्टचा उपाध्यक्ष म्हणून कार्य करण्याची संधी लाभली, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे, असेही आ. श्री. मुनगंटीवार म्हणाले.
भौतिक सुविधा शरीराची साधना घडवतात, पण मन आणि चित्ताचा खरा आनंद भजनातूनच प्राप्त होतो. भजन साहित्य ही मनाच्या समाधानाची एक समृद्ध बँक आहे. भजनाची राजधानी म्हणून मोझरी ओळखली जावी अशी इच्छा राष्ट्रसंतांच्या चरणी नतमस्तक होऊन व्यक्त केली. मनाचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी भजन अत्यंत महत्त्वाचे आहे. भजनाच्या माध्यमातून चित्ताला समाधान मिळते आणि चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलते. भजन साहित्य हे त्याचे सर्वांत मोठे माध्यम आहे, असेही आमदार श्री. मुनगंटीवार म्हणाले. यावेळी आमदार श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते निवडणूक काळात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत भजन मंडळांना भजन साहित्याचे वितरण करण्यात आले.
					
					
					
					
					


