जनजाती गौरव वर्ष पंधरवडा मोहीम
आदिवासी समाजाचा अभिमान व विकासाचा संकल्प

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर :_ जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत “जनजाती गौरव वर्ष पंधरवडा मोहीम” दिनांक १ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत मोठ्या उत्साहात राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा उद्देश आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक परंपरा, ऐतिहासिक वारसा आणि सामाजिक योगदानाचा गौरव साजरा करणे तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासकीय योजनांचा लाभ सर्वांना मिळवून देणे हा आहे.
या पंधरवड्यात शाळा, ग्रामपंचायती, सामाजिक संस्था आणि स्थानिक स्वयंसेवी संघटनांच्या सहभागातून विविध जनजागृती उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत. यामध्ये आदिवासी परंपरा व लोककलेचे प्रदर्शन,आदिवासी वीरपुरुषांच्या कार्यावर व्याख्यान व निबंध स्पर्धा,आरोग्य व शिक्षण जनजागृती शिबिरे, स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धन उपक्रम,तसेच ‘वनवासी गौरव मेळावे’ यांचा समावेश आहे.
या मोहिमेत जल जीवन मिशन या केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमालाही विशेष स्थान देण्यात आले आहे. जिल्हा परिषद चंद्रपूर तर्फे आदिवासी व दुर्गम भागातील गावांमध्ये “प्रत्येक घर नळाने पाणी” हा उद्देश साध्य करण्यासाठी जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. ग्रामसभांमधून नागरिकांना पाण्याचे महत्त्व, पाणी शुद्धीकरण, पाणी बचत, तसेच पाणीपुरवठा योजनांच्या देखभालीत लोकसहभागाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी सर्व विभाग प्रमुख, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींना या पंधरवड्यात सक्रिय सहभाग घेऊन “संस्कृतीचा सन्मान आणि विकासाचा संकल्प” पूर्णत्वास नेण्याचे आवाहन केले आहे.
या उपक्रमातून आदिवासी समाजाच्या गौरवाबरोबरच स्वच्छ पाणी, आरोग्य आणि सशक्त ग्रामीण भारत या ध्येयाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
					
					
					
					
					


