शिक्षक व विद्यार्थी आले 20 वर्षांनी एकत्र!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
हल्लीच्या काळात भुतलावरची मंडळी आपापल्या जीवनात व्यस्त आहे.या धकाधकीच्या जीवनात नाती,गोती,मित्रमंडळी दुरावली असून फक्त मोबाईलवर शिल्लक असल्याचे अनुभवास येत आहेत.प्रत्येकजण सोशल मीडियावरून संबंध जोपासत असतांना या आधुनिक तंत्रज्ञानाचा एक पराक्रम पुढे आला आहे.
कोरपना तालुक्यातील गाव नांदा येथील 20 वर्षांपूर्वी(1996)पहिल्या वर्गापासून सातव्या वर्गापर्यंत एकत्रितपणे शिक्षण घेतलेले मित्र या सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्रित येण्याचा योग जुळून आला.यानिमित्ताने सामाजिक दृष्टिकोन आणि जुन्या आठवणींना नव्याने उजाळा मिळावा,म्हणून स्नेह मिलन सोहळा आयोजित करण्या आला.एकुणच सोशल मीडियाचा योग्य वापराने आज 20 वर्षांपूर्वीच्या मित्रांना एकमेकांना भेटता आला.
सकाळ पासूनच शाळेतील प्रांगणात मोठा उत्साह व रंगरागोटी त्या सोबत प्रत्येक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आंनद दिसून आला तर अनेकांच्या चेहऱ्यावर बालपणीच्या आठवणी झळकत होती.त्यावेळच्या सोनेरी क्षण डोळ्यात साठवून ‘माझी शाळा माझी आठवण’ यामध्ये व्यस्त दिसत होते.या समूहातील अनेक विद्यार्थी आजघडीला वेगवेगळ्या क्षेत्रातील मोठमोठ्या पदांवर राहून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहे तर अनेक जण सीमेवर राहून देश सेवेत मग्न आहेत.
स्नेह मिलन सोहळा,कार्यक्रमच्या सुरवातीला महामानवांच्या प्रतिमेला दीप प्रज्वलन करण्यात आले.त्याचबरोबर आज जे आपल्यात नाहीत त्यांच्यासाठी दोन मिनिटाचे मौन बाळगून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली.यामध्ये अनेक बालपणीच्या विद्यार्थ्यांनी आपापल्या जुन्या आठवणींना मनोगतातून उजाळा दिला.तर काहींनी कला व गितातून मन भारावून घेतले.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक भोंगळे सर,शिक्षक ज्ञानेश्वर ढोरे,चंद्रकांत पांडे,संजय कुळसंगे,रवींद्र पाकमोडे,प्रज्ञाकुमार धोटे,गोविंदप्रसाद गुप्ता इत्यादी शिक्षकांसह विद्यार्थी व विद्यार्थीनींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
या सर्व घडामोडीत उपस्थित विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले तर शिक्षकांचे मन भारावून गेले होते.संचालन नितेश मालेकर,प्रास्ताविक अनिल पेंदोर,आभार प्रफुल विरुटकर यांनी व्यक्त केले.एकंदरीत हा स्नेह मिलन सोहळा कार्यक्रम आगामी काळातील आठवणीची शिदोरी आहे हे मात्र विशेष.
					
					
					
					
					


