पिपरी,तेलवासा-ढोरवासा रस्त्याची दुरुस्ती करा : शिवसेनेचे निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
सुमठाना-ढोरवासा-तेलवासा-पिपरी-कोच्ची-घोनाड ते मुरसा या मुख्य रस्त्याची जड वाहतुकीमुळे अत्यंत खस्ता हालत झालेली आहे.त्यामुळे सबंधित गावातील ग्रामस्थांना व शाळकरी विद्यार्थ्यांना भद्रावतीला ये-जा करण्याकरिता कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.
मागील महिन्यात या खराब रस्त्यामुळे प्रवासी ऑटो उलटून झालेल्या अपघातामध्ये ५ महिलांना गंभीर दुखापती झाल्या. दररोज या रस्त्यावर अपघाताची शृंखला सुरूच आहे. सदर रस्ता ग्रामीण भागाला जोडणारा असला तरी या रस्त्याने मोठ-मोठी हायवा ट्रक रेती वाहतूक करणारे वाहन मोठ्या संख्येने वाहतूक करीत असल्याने या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.ज्यामुळे या रस्त्यावर भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.सदर रस्त्याचे तात्काळ डांबरीकरण करण्यात यावे.
अन्यथा या रस्त्याचे नूतनीकरण होणार नाही तो पर्यंत रेती वाहतूक करणाऱ्या हायवा ट्रकांची रस्ता रोको करून वाहतूक बंद आंदोलन करणार असल्याचा इशारा ढोरवासा ग्राम पंचायतचे सरपंच मुनेश्वर बदखल यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.याप्रसंगी आकाश जुनघरे (सरपंच चारगाव- तेलवासा गट ग्रामपंचायत),हनुमान डंभारे,सुनील गोवारदीपे,शालिक आसूटकर,दिलीप वरखडे,प्रल्हाद वरखडे,रवि तुरारे,ज्ञानेश्वर बहिरे,नारायण तुरानकर,नगराळे दिलीप चौधरी आदींची उपस्थिती होती.
					
					
					
					
					


