इको-प्रो आणि इकॉर फाउंडेशन तर्फे पक्षी सप्ताहाचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
इको-प्रो तथा इकॉर फाउंडेशन तर्फे दि.५ते १२ नोव्हेंबर दरम्यान पक्षी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.पक्षी निरीक्षण व पक्षांबद्दल जनजागृती हा या सप्ताहाचा उद्देश आहे. भारतीय पक्षी विश्व जागतिक स्तरावर पोहोचवणारे डॉ.सलीम अली व वन्यजीव अभ्यासक अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांच्या जयंतीचे औचित्य साधून या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
याद्वारे जैवविविधता व पक्षी निरीक्षणच्या माध्यमातून विद्यार्थी तसेच नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. या सप्ताहाची सुरुवात दि. ५ नोव्हेंबरला सकाळी ६.३० वाजता दुधाळा तलाव परिसर स्वच्छता अभियानाद्वारे होणार आहे. दि.६ ते ८ आणि १०ते ११ नोव्हेंबरला सकाळी ६.३० वाजता तालुक्यातील विविध तलावाचे ठिकाणी पक्षी निरीक्षणाचा कार्यक्रम होईल.
यात घोडपेठ, सुमठाणा, गवराळा,सावरी, डोलारा या तलावांचा समावेश आहे. दि.९ नोव्हेंबरला हुतात्मा स्मारक येथे सकाळी ७.३० वाजता शालेय विद्यार्थ्यांकरिता चित्रकला स्पर्धा तसेच टाकाऊ वस्तूंपासून त्यांनी बनवलेली पक्ष्यांची घरटी व पक्षी फिडरचे प्रदर्शन लावण्यात येणार आहे. शेवटच्या दिवशी दि.१२ नोव्हेंबरला सकाळी ८.३० वाजता नागमंदिर ते यशवंतराव शिंदे विद्यालयापर्यंत पक्षी व पर्यावरण संवर्धन जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. नंतर याच ठिकाणी होणाऱ्या समारोपीय कार्यक्रमात यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात येणार आहे.
पक्षी निरीक्षण उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी तसेच निसर्गप्रेमी, सामाजिक संघटना तसेच नागरिकांनी पक्षी निरीक्षण स्थळी जाण्याकरता सकाळी ६ वाजता नगरपरिषद कार्यालयासमोर आपले वाहन व इतर साहित्यासह ज्यात कॅमेरा, दुर्बीण, पाणी इत्यादीसह उपस्थित राहण्याचे अहवाल इको- प्रो चे संदीप जीवने यांनी केले आहे.
					
					
					
					
					


