गाडगेबाबांच्या भूमिकेतून गुरुजींनी दिला स्वच्छतेचा संदेश
वायगाव येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ५७ वा पुण्यतिथी महोत्सव

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवानिमित्त वायगाव येथे विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात गाडगेबाबांच्या भूमिकेतून श्री जगन्नाथ बाबा विद्यालय वायगाव चे सहाय्यक शिक्षक मंगेश बोढाले यांनी स्वच्छतेचा प्रभावी संदेश दिला. त्यांच्या प्रेरणादायी सादरीकरणामुळे उपस्थितांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती निर्माण झाली.
याप्रसंगी जि. प. उच्च प्राथमिक शाळा वायगाव येथील विद्यार्थ्यांनी एकपात्री अभिनय स्पर्धा तसेच जगन्नाथ बाबा विद्यालय वायगावच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता विषयावर आधारित पथनाट्य सादर केले. विद्यार्थ्यांच्या सशक्त अभिनयातून स्वच्छतेचे महत्त्व, सार्वजनिक स्वच्छता व वैयक्तिक जबाबदारी याबाबत समाजाला मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला भरभरून दाद दिली.
या कार्यक्रमाला गुरुदेव सेवा मंडळाचे सर्व पदाधिकारी, ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी, जि. प. उच्च प्राथमिक शाळा वायगाव चे सर्व विद्यार्थी मुख्याध्यापक व शिक्षक, जगन्नाथ बाबा विद्यालय वायगावचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद, विद्यार्थी तसेच समस्त ग्रामवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्वांनी सहकार्य केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांप्रमाणे स्वच्छता, सेवा व सामाजिक बांधिलकी जपण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.



