महापौर व उपमहापौर पदासाठी नामनिर्देशन प्रक्रिया पूर्ण
महापौर पदासाठी १० तर उपमहापौर पदासाठी ६ नामनिर्देशन पत्रे दाखल

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडीसाठी नामनिर्देशन दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, सकाळी ११ ते दुपारी ३ या निर्धारित कालावधीत महापौर पदासाठी एकूण १०, तर उपमहापौर पदासाठी ६ नामनिर्देशन पत्रे दाखल करण्यात आली आहेत.
महापौर पदासाठी दाखल झालेल्या नामनिर्देशनांमध्ये भारतीय जनता पार्टीकडून ५, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून ४, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून १ नामनिर्देशन दाखल झाले आहे.

महापौर पदासाठी नामनिर्देशन दाखल करणाऱ्या उमेदवारांमध्ये –
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून मनस्वी संदीप गिऱ्हे,
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून संगीता मंगल भोयर, संगीता गोपालकृष्ण अमृतकर, सुनंदा दिलीप धोबे व वैशाली अजय महाडूळे,
तर भारतीय जनता पार्टीकडून संगीता राजेंद्र खांडेकर (३ अर्ज) व सारिका सचिन संदुरकर (२ अर्ज) यांचा समावेश आहे.
दरम्यान, उपमहापौर पदासाठी दाखल झालेल्या एकूण ६ नामनिर्देशन पत्रांमध्ये –
भारतीय जनता पार्टी – २, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस – २, भारतीय शेतकरी कामगार पक्ष – १, तसेच अपक्ष – १ नामनिर्देशनाचा समावेश आहे.
उपमहापौर पदासाठी नामनिर्देशन दाखल करणाऱ्या उमेदवारांमध्ये –
अपक्ष उमेदवार प्रशांत आनंदराव दानव,
भारतीय शेतकरी कामगार पक्षाकडून प्रदीप शंकर देशमुख,
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून वसंत राजेश्वर देशमुख व राहुल गेंदलाल चौधरी,
तर भारतीय जनता पार्टीकडून संजय नारायण कंचर्लावार (२ अर्ज) यांचा समावेश आहे.
महापौर व उपमहापौर पदांच्या निवडीसाठी मा.पिठासीन अधिकारी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या अध्यक्षतेखाली १० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता मनपा राणी हिराई सभागृहात विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे.
या सभेमध्ये पिठासीन अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात येणार असून, छाननीअंती वैध उमेदवारांची नावे जाहीर केली जातील. त्यानंतर १५ मिनिटांच्या कालावधीत लेखी नोटीस देऊन उमेदवारी मागे घेता येणार आहे. पुढे निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची नावे घोषित करून हात वर करून मतांची नोंद घेण्यात येणार असून, उक्त प्रक्रियेनंतर पिठासीन अधिकारी निवडणूक निर्णयाची घोषणा करतील.



