सामाजिक बांधिलकीचा आदर्श : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज क्रीडांगणाचे समतलीकरण पूर्ण
विद्यार्थ्यांच्या मैदानी चाचण्यांचा मार्ग मोकळा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
शहरातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज क्रीडांगण येथे दीर्घकाळापासून असमतोल पृष्ठभाग व खड्ड्यांमुळे विद्यार्थ्यांच्या मैदानी चाचण्या, क्रीडा सराव तसेच भरतीपूर्व तयारीत अडचणी येत होत्या. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते व क्रीडाप्रेमींनी पुढाकार घेत स्वखर्चातून मैदानाचे समतलीकरण (लेव्हलिंग) करण्याचे काम यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे.
मैदानाच्या दुरवस्थेमुळे शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी, पोलीस व सैन्य भरतीची तयारी करणारे उमेदवार तसेच स्थानिक खेळाडूंना दुखापतीचा धोका निर्माण होत होता. ही बाब लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते एकत्र येत प्रत्यक्ष पाहणी केली. कोणत्याही शासकीय निधीची प्रतीक्षा न करता लोकसहभागातून काम हाती घेण्यात आले आणि नियोजनबद्ध पद्धतीने मैदान समतोल करण्यात आले.
या उपक्रमासाठी रविभाऊ मेश्राम, सुयोगकुमार बाळबुदे सर, मोंटूभाऊ पिलारे, अनुकूलभाऊ शेंडे, भूषणभाऊ रामटेके, रविभाऊ चहांदे व आशिषभाऊ सोंडवले यांनी आर्थिक सहकार्य केले. त्यांच्या योगदानामुळे हे काम वेळेत व सुरळीत पूर्ण होऊ शकले.
तसेच हे काम मार्गी लावण्यासाठी विहार मेश्राम (विद्यार्थी मित्र व सामाजिक कार्यकर्ता, ब्रह्मपुरी), सुनील साळवे सामाजिक कार्यकर्ता, मयूर चहांदे सामाजिक कार्यकर्ता, मनोज धनवीज सामाजिक कार्यकर्ता, रक्षित रामटेके सामाजिक कार्यकर्ता, प्रफुल नागापुरे सर (संचालक, लक्ष्य फिजिकल अकॅडमी), कुंदन गायकवाड सर (संचालक, द राईस फिजिकल अकॅडमी) यांनी पुढाकार घेऊन नियोजन, समन्वय आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीची जबाबदारी पार पाडली.याशिवाय ब्रह्मपुरी नगरपरिषदेच्या नवनियुक्त मुख्याधिकारी सलामे मॅडम यांचेही या उपक्रमात मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्या पाठिंब्यामुळे कामाला गती मिळाली आणि मैदानाचे समतलीकरण यशस्वीरीत्या पूर्ण होऊ शकले.
या कामामुळे आता विद्यार्थ्यांच्या मैदानी चाचण्या, नियमित क्रीडा सराव, धावणे व इतर शारीरिक चाचण्या सुरक्षित आणि अडथळ्याविना घेता येणार आहेत. विशेषतः ग्रामीण व मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवरच आवश्यक सुविधा उपलब्ध झाल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
लोकसहभागातून पूर्ण झालेला हा उपक्रम सार्वजनिक सुविधांच्या विकासासाठी सामाजिक बांधिलकी किती महत्त्वाची आहे याचे उत्तम उदाहरण ठरत असून, क्रीडाप्रेमी, विद्यार्थी व पालकांनी या कार्याचे स्वागत केले आहे. पुढील काळात प्रशासनाने क्रीडांगणाच्या कायमस्वरूपी विकास व नियमित देखभालीसाठी ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.



