गावागावात अध्यात्मिक व सामाजिक बळ निर्माण करण्याचे ध्येय _ आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला निर्धार
अध्यात्मिकतेसोबत महिला सक्षमीकरणालाही चालना : चंद्रपुर येथील श्री कन्यका माता मंदिर सभागृहात साहित्य वितरण सोहळा

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर :- राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर मतदारसंघातील गावागावांमध्ये सामाजिक आणि अध्यात्मिक बळ निर्माण करणे हेच आपले ध्येय असल्याचा निर्धार व्यक्त केला. बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील भजन मंडळे आणि महिला बचत गटांना त्यांच्या हस्ते साहित्य वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
गावागावात अध्यात्मिक वातावरण निर्माण होणे आणि महिला बचत गटांनामध्ये स्वावलंबनाचे बळ निर्माण होणे हेच या उपक्रमामागील प्रमुख ध्येय आहे. भजन, कीर्तन आणि सामाजिक उपक्रमांमुळे गावांमध्ये सकारात्मकता वाढते, तर महिला बचत गटांच्या माध्यमातून कुटुंबाच्या अर्थकारणाला हातभार लागतो. त्यामुळे समाजाच्या सर्व घटकांना सक्षम करण्यासाठी असे उपक्रम सातत्याने राबविण्यात येत असल्याचे आमदार श्री. मुनगंटीवार म्हणाले.
बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील मुल, बल्लारपूर, पोंभूर्णा व चंद्रपूर या चार तालुक्यांतील विविध भजन मंडळे आणि महिला बचत गटांना साऊंड सिस्टिम व स्वयंपाकासाठी लागणाऱ्या भांड्यांचे वितरण आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते श्री कन्यका माता मंदिर सभागृह, चंद्रपूर येथे करण्यात आले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा,श्री माता कन्यका सेवा संस्थेचे सचिव राजेश्वर सुरावार ,श्रीनिवास जंगमवार, बंडू गौरकार, चंदू मारगोनवार, गौतम निमगडे, केमाताई रायपुरे, वर्षाताई लोनबले आदिंची उपस्थिती होती. या उपक्रमांतर्गत एकूण 113 मंडळांना साऊंड सिस्टिम आणि 60 महिला बचत गटांना 15 हजार रुपये किमतीच्या स्वयंपाकाच्या भांड्यांचे वाटप करण्यात आले.
मुल तालुक्यातील 56 मंडळांना साऊंड सिस्टिम व 32 महिला गटांना भांड्यांचे पास देण्यात आले. पोंभूर्णा तालुक्यातील 29 मंडळांना साऊंड सिस्टिम व 12 गटांना भांडी, चंद्रपूर तालुक्यातील 20 मंडळांना साऊंड सिस्टिम व 8 गटांना भांडी, तर बल्लारपूर तालुक्यातील 8 मंडळांना साऊंड सिस्टिम व 8 गटांना भांडी आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते वितरित करण्यात आली.
गावातील नागरिक, भजन मंडळे तसेच कार्यकर्त्यांकडून या संदर्भात मागणी करण्यात आली होती. गावांमध्ये भजनासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध असून साऊंड सिस्टिम उपलब्ध झाल्यास गावागावात आध्यात्मिक वातावरण निर्माण होण्यास मोठी मदत होईल, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
यापूर्वीही विधानसभा क्षेत्रात पहिल्या टप्प्यात 180 भजन मंडळांना आणि दुसऱ्या टप्प्यात 23 भजन मंडळांना असे एकूण 203 भजन मंडळांना साहित्यांचे वाटप करण्यात आले आहे. तसेच 65 वर्षांवरील 9,900 ज्येष्ठ नागरिकांना काठीचे वाटप करून त्यांना आधार देण्यात आला. नेत्रचिकित्सा शिबिरांद्वारे 50 हजारांहून अधिक नागरिकांचे डोळे तपासण्यात आले असून 35 हजार नागरिकांना चष्मे देण्यात आले. तर 7 हजारांहून अधिक रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
याशिवाय, चंद्रपूर येथे 140 बेड्सचे कॅन्सर हॉस्पिटल उभारण्यात आले असून अवघ्या एका महिन्यात 800 रुग्णांनी येथे उपचार घेतले आहेत. राज्यात ज्या आधुनिक सोयी उपलब्ध नाहीत, त्या सुविधा मतदारसंघात उभारण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी आमदार श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.


