ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अंतराळ संशोधनाच्या दिशेने मनवाची झेप

JAXA कडून जपान भेटीसाठी निवड 

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर येथील चांदा पब्लिक स्कूल या शाळेत इयत्ता सहावीत शिकणारी विद्यार्थिनी कु. मनवा प्रियंका पुरुषोत्तम वंजारी हिची जपान अंतराळ संशोधन संस्था (JAXA) कडून जपान भेटीसाठी निवड झाली आहे. ही बाब शाळा, पालक व परिसरासाठी अभिमानास्पद ठरली आहे.

कु. मनवा ही इयत्ता पाचवीपासून कोची, केरळ स्थित इदुमित्रा इंटलेक्युयल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेमार्फत इयत्ता ५ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या अंतराळ संशोधन व विज्ञान शाखेतील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील ऑनलाइन स्पर्धात्मक परीक्षांमध्ये सातत्याने सहभागी होत आहे.

या परीक्षांअंतर्गत देशस्तरावर घेण्यात आलेल्या ‘इंडियन स्पेस सायन्स ऑलिम्पियाड’ या स्पर्धेत मनवाने सहभाग घेतला होता. या परीक्षेच्या पहिल्या फेरीत यश मिळविल्यामुळे ती दुसऱ्या फेरीसाठी पात्र ठरली. दुसऱ्या फेरीअंतर्गत बंगळूरू येथील भारतीय विज्ञान संस्था (IISc) येथे दि. २७ ते २९ डिसेंबर २०२५ या कालावधीत आयोजित तीन दिवसीय कार्यशाळेत तिने सहभाग घेतला.

या कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांना भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) शी निगडित तज्ज्ञ व शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन लाभले. त्यानंतर घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेत कु. मनवा हिने उत्तीर्ण होत तिसऱ्या फेरीसाठी पात्रता मिळवली.

या अंतिम फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील अंतराळ संशोधन संस्थांना भेट देण्याची संधी दिली जाते. त्यानुसार कु. मनवा वंजारी हिची जपानस्थित जपान एअरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी (JAXA) येथे भेट देण्यासाठी निवड झाली आहे.

मनवाच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही अभ्यासाबरोबरच विज्ञान, अंतराळ संशोधन व नव्या विषयांकडे वळण्याची प्रेरणा मिळाली आहे. नियमित अभ्यास, जिज्ञासा, सातत्य आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ग्रामीण व सामान्य पार्श्वभूमीतील विद्यार्थीही आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवू शकतात, हे मनवाने दाखवून दिले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी केवळ पाठ्यपुस्तकांपुरते न राहता विज्ञान, संशोधन, स्पर्धात्मक परीक्षा व नव्या संधी यांचा शोध घ्यावा, असे आवाहन शाळेच्या वतीने करण्यात येत आहे.

मनवाच्या या यशामागे तिची वैज्ञानिक जिज्ञासा, सातत्यपूर्ण अभ्यास, पालकांचे पाठबळ आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यांचा मोलाचा वाटा आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून तिचे अभिनंदन होत असून, भविष्यात ती अंतराळ संशोधन क्षेत्रात उज्ज्वल कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये