ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आष्टा वाल्मिकी मच्छीमारी संस्थेत भ्रष्टाचार : माजी अध्यक्ष व सचिव यांच्यावर कारवाई करा

त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा : पत्र परिषदेत मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

   भद्रावती तालुक्यातील आष्टा वाल्मिकी मच्छीमारी सहकारी संस्थेमध्ये माजी अध्यक्ष आणि सचिवांनी मिळून विविध कामात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला. या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊन सुद्धा त्यांनी कोणतीच कारवाई न केल्याने झालेल्या आम सभेत या अधिकाऱ्यांना सुद्धा निलंबित करण्याची मागणी करण्यात आल्याची माहिती संस्थेचे माजी सचिव दिवाकर गोहने यांनी पत्र परिषदेत दिली.

न्याय न मिळाल्यास दि.१० नोव्हेंबरला संस्थेचे सदस्य कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आमरण उपोषणाला बसणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

 सन २०२४-२५ ते २०२९-२०३०या कालावधी दि.१ जून २०२५ रोजी निवडणूक पार पडली. दि.९जूनला संस्थेचे नवनियुक्त अध्यक्ष रवींद्र मेश्राम यांनी कार्यभार हाती घेतला. त्यानंतर लगेचच दि.१० जूनला संस्थेचे माजी अध्यक्ष आनंदराव मेश्राम आणि सचिव सुरज भोयर यांनी बँकेमधून१ लाख २० हजाराची रक्कम नियमबाह्य रीतीने काढली. संस्थेच्या बचत खात्यात ७० हजार रुपये शिल्लक व अखेची शिल्लक १६५ रुपये असताना याच अध्यक्ष व सचिव यांनी १ लाख ३४ हजार रुपयांचे मत्स्यबीज खरेदी केले.

ही आगाऊ रक्कम कुठून आणली हा प्रकार देखील वरिष्ठांच्या लक्षात आणून दिला. मृतक माजी सचिव मारोती भोयर यांचे ४८ हजार ८०० रुपयांचे मानधन खतावणी रजिस्टरवर दाखवले परंतु ते दिले नसल्याचा आरोप त्यांची पत्नी ताराबाई भोयर यांनी पत्र परिषदेत केला. यासह इतर कामात त्यांनी भ्रष्टाचार केल्याने आपण विनाकारण यात गोवल्या जाऊ या भीतीने नवनियुक्तया संचालक मंडळातील ९ सदस्यांपैकी ५ सदस्यांनी राजीनामा दिल्याने नवनियुक्त संचालक मंडळ बरखास्त झाले. त्यानंतर या ठिकाणी प्रशासक म्हणून सहाय्यक निबंधक आर.आर. कोमावार यांची नियुक्ती करण्यात आली. दि.१५सप्टेंबर २०२५ ला कोमावार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या आमसभेत माजी अध्यक्ष आनंद मेश्राम सचिव सुरज भोयर यांनी केलेल्या भ्रष्टाचारा संदर्भात त्यांचेवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात यावा.

तसेच त्यांना पाठीशी घालणाऱ्या सहाय्यक निबंधक सहकारी संस्था ( दुग्ध) चंद्रपूर एस. एस.तुपट आणि आर.आर.कोमावार यांना निलंबित करण्यात यावे असा ठराव घेण्यात आला. याची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.यांनी तात्काळ निर्णय न दिल्यास दि.१०नोव्हेंबरला संस्थेचे सदस्य कुटुंबासह मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषणाला बसणार असल्याची माहिती यावेळी दिली. पत्र परिषदेला दिवाकर गोहने,राहुल गोहने, गोपाल भोयर, गोरखनाथ गोहणे, रवींद्र मेश्राम, दिलीप गोहणे, तानेबाई गोहणे,अल्का सहारे यासह असंख्य संस्थाचे सदस्य उपस्थित होते.

           संस्थेच्या ऑडिटमध्ये काहीच आढळले नाही.परंतु संस्थेच्या तक्रारीनंतर सदर प्रकरण पुनर्परीक्षण लेखा समितीकडे पाठविले आहे. त्यांच्या चौकशीनुसार नंतर कारवाई करण्यात येईल. 

              एस.एस.तुपट, सहायक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध) चंद्रपूर

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये