ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

उज्वल गौरक्षण संस्थेचे सामाजिक सेवा, धर्मप्रसार आणि संस्कार निर्मितीचे कार्य प्रेरणादायी – आ. जोरगेवार

गौरक्षण आणि अध्यात्माचा संगम : लोहारा येथे अन्नकूट महाप्रसाद कार्यक्रम संपन्न

चांदा ब्लास्ट

उज्वल गौरक्षण संस्थेने अन्नकूट महाप्रसादाचे आयोजन करत श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक ऐक्याचा सुंदर मिलाफ घडवून आणला आहे. अन्नकूट महाप्रसादाचा हा सोहळा म्हणजे केवळ धार्मिक परंपरा नाही, तर ती आपल्या संस्कृतीचा, करुणेचा आणि सेवाभावाचा सजीव उत्सव आहे. या संस्थेने केवळ गौरक्षा केली नाही, तर सामाजिक सेवा, धर्मप्रसार आणि संस्कारनिर्मितीचे कार्य देखील आत्मभावाने केले आहे. हे कार्य प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

रविवारी उज्वल गौरक्षण संस्था, चंद्रपूर यांच्या वतीने लोहारा येथे श्रद्धा, भक्ती आणि सामूहिक भावनेने अन्नकूट महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दिव्य वातावरणात सतत चालणाऱ्या हरिनाम कीर्तनाने आणि भक्तीमय गजरांनी परिसर भक्तिरसाने न्हाऊन निघाला. समाजातील विविध स्तरांतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घेतला. या कार्यक्रमात आमदार किशोर जोरगेवार बोलत होते.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, महामंत्री मनोज पाल, उज्वल गौरक्षण संस्थेचे जुगलकिशोर सोमानी, दीपक पारख, हेमंत शाहा, देशपांडे, दिनेश बजाज, हेमंत बुट्टन, मेहुल सजदे, गौरीशंकर मंत्री, सुधीर बजाज, कैलास सोमानी, राजेश डागा आदींची उपस्थिती होती.

पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, गौमाता ही भारतीय संस्कृतीत मातृ स्वरूप मानले जाते. तिच्या संरक्षणातूनच पर्यावरण, शेती आणि समाज यांचे संतुलन टिकते. आज येथे उपस्थित सर्व भाविकांनी ज्या भक्तिभावाने सहभाग घेतला आहे, तो आपल्यातील सामाजिक एकात्मतेचा उत्तम नमुना आहे. सततचा हरिनाम कीर्तनाचा ध्यास आणि दिव्य वातावरण हे केवळ अध्यात्म नव्हे, तर जीवनशुद्धीचा मार्ग आहे. अशा संस्था समाजाला दिशा देतात आणि सेवा, सद्भाव व संस्कार यांची मूल्ये दृढ करतात. या उपक्रमातून प्रेरणा घेऊन समाजासाठी काहीतरी देण्याचा संकल्प करावा, असे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.

गौरक्षण हे केवळ धार्मिक कर्तव्य नाही, तर ते आपल्या संस्कृतीचे, संवेदनेचे आणि पर्यावरणाच्या संरक्षणाचे प्रतीक आहे. अशा उपक्रमांमुळे समाजात सद्भाव, संस्कार आणि सेवा यांची भावना अधिक दृढ होते. आजच्या अन्नकूट कार्यक्रमात जी एकात्मता आणि श्रद्धा दिसली, ती समाजातील ऐक्याचे जिवंत उदाहरण असल्याचे ते यावेळी म्हणाले. कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये