नांदा येथे परिस स्पर्श समितीची भेट

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
सद्गुरु जगन्नाथ बाबा शिक्षण मंडळ, नांदा येथे परिस स्पर्श समितीने 2 फेब्रुवारी रोजी सदिच्छा भेट दिली. या भेटीमध्ये आलेल्या पाच सदस्यांच्या समितीने नॅक प्रक्रियेसंबंधी विस्तृत माहिती दिली. यामध्ये प्रामुख्याने नॅक समितीचे रजिस्ट्रेशन कसे करायचे? प्रत्येक दस्तऐवज सांभाळून कसा ठेवायचा? ऑनलाइन फॉर्म आणि ऑनलाईन माहिती कशी भरायची? सर्व माहिती जतन कशी करून ठेवायची? यासंबंधी परिस स्पर्श समितीच्या प्रमुख मार्गदर्शिका डॉ. अपर्णा धोटे यांनी विस्तृत अशी माहिती दिली.
या मार्गदर्शनाच्या कार्यक्रमात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय मंडळ, नांदाच्या अध्यक्षा सौ. सुनीता लोढीया, संस्थेचे सचिव मा. डॉ. अनिल मुसळे, संस्थेचे सदस्य श्री. किसनजी गोंडे, श्री. प्रेमनाथ पानघाटे, श्री. मनोहर झाडे, प्रभारी प्राचार्य श्री. देवेंद्र हेपट, प्रभारी प्राध्यापक डॉ. आर. एम. शंभरकर, डॉ. रौनक लोढीया यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
नॅक सारख्या अत्यंत महत्त्वाच्या समितीला सामोरे जाण्याअगोदर संस्थेने कोणती खबरदारी घ्यायला हवी? माहितीची संग्रहण कसे करून ठेवावे? व चांगला ग्रेड कसा प्राप्त करावा? यासंबंधी माहिती गोळा करण्यासाठी गोंडवाना विद्यापीठाने परिस स्पर्श समितीची स्थापना केली असल्याने या समितीने मार्गदर्शनपर जे काही मुद्दे आपल्यासमोर मांडले त्या मुद्द्यांवर जास्तीत जास्त लक्ष दिल्यास नॅकसारख्या अत्यंत कठीण मूल्यांकन करणाऱ्या समितीला सामोरे जाताना आपल्याला अजिबात अडचण जाणार नाही, असे मत संस्थेच्या अध्यक्षा सुनीताताई लोढीया यांनी मांडले.



