ऊर्जानगर येथील विकासकामे ठरणार महत्त्वपूर्ण अध्याय. _ आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास
चंद्रपूरचा चेहरामोहरा बदलण्यात देणार मोलाचे योगदान

चांदा ब्लास्ट
ऊर्जानगर येथील अय्यप्पा मंदिर ते गोपाल डेअरीपर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकामाचे भूमिपूजन
बांधकामासाठी 2 कोटी 50 लक्ष रुपयांचा निधी मंजूर
चंद्रपूर : ऊर्जानगर येथील विकासकामे चंद्रपूर शहराच्या सर्वांगीण विकासातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. या कामांच्या निमित्ताने प्रगतीचा एक नवा अध्याय लिहिला जाणार आहे, असा विश्वास राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
ऊर्जानगर परिसरातील रस्ते अत्यंत दयनीय अवस्थेत असल्यामुळे नागरिकांना प्रवास करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागायचा. याठिकाणी सिंमेट काँक्रीटचा रस्ता बांधण्याची आग्रही मागणी नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच कामगार नेत्यांनी केली होती. ऊर्जानगर येथे अय्यप्पा मंदिर ते गोपाल डेअरीपर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकामाचे भूमिपूजन आ. श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाला सरपंच मंजुषा येरगुडे, रामपाल सिंग, श्रीनिवास जंगम, विलास टेंभुर्णे, फारुक शेख, गौतम निमगडे, नामदेव आसुटकर, अनिताताई भोयर, रोशनी खान, रुद्रनारायण तिवारी, केमा रायपुरे, लक्ष्मीताई सागर, उज्वला टापरे, घनश्याम यादव, सुरेखा थोरात, रंजनाताई किन्नाके, अंकित चिकटे, अनिल डोंगरे, देवानंद थोरात, अमोल जगताप, मोहन आसवानी, नागेश कडूकर, शंकर खत्री, सुनील बरयेकर तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांची उपस्थिती होती.
यासाठी 2 कोटी 50 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, रस्त्याच्या बांधकामासोबतच नाली, पेव्हर ब्लॉक आणि बसण्यासाठी बेंचेसचीही सोय करण्यात येत आहे. चंद्रपूर शहराच्या विकासातील महत्त्वपूर्ण प्रकल्पांच्या मालिकेत ऊर्जानगरचा हा प्रकल्प आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरेल, अशी ग्वाहीदेखील आ. श्री. मुनगंटीवार यांनी दिली.
आमदार श्री.सुधीर मुनगंटीवार म्हणाले, या परिसरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब होती. या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे येथील नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कामगार नेत्यांनी सिंमेट रस्ता बांधून देण्याची आग्रही मागणी केली होती. या रस्त्याच्या बांधकामासाठी 2 कोटी 50 लक्ष रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला. या रस्त्याच्या बांधकामासोबतच नाली, पेव्हर ब्लॉक तसेच बसण्यासाठी बेंचेसचीही व्यवस्था करण्यात येत आहे. 14 जानेवारी पूर्वी रस्त्याचे काम पूर्णत्वास न्यावे, रस्त्याचा दर्जा आणि गुणवत्ता लक्षात घेऊन काम केल्यास हा रस्ता पुढील 25 वर्षे उत्तम स्थितीत टिकून राहील. जिल्ह्याचा सर्वंकष व सर्वांगीण विकास व्हावा यादृष्टीने कार्य हाती घेण्यात आले असल्याचे ते म्हणाले.
पुढे आ.मुनगंटीवार म्हणाले, दहा वर्षांत साडेचारशे पेक्षा जास्त किलोमीटर राष्ट्रीय महामार्गांच्या (नॅशनल हायवे) कामे मंजूर केली. चंद्रपूरचा वैद्यकीय महाविद्यालय महाराष्ट्रातील इतर वैद्यकीय महाविद्यालयांपेक्षा अधिक उत्कृष्ट ठरणार आहे. महाराष्ट्रातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अनेक सुविधा असतील, मात्र चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय हे असे एकमेव महाविद्यालय असेल, ज्यामध्ये हेलिकॉप्टर ॲम्बुलन्ससाठी हेलीपॅडची व्यवस्था असणार आहे.
देशातील पहिली हेलियम विरहित एमआरआय मशीन उपलब्ध:
रतन टाटा यांनी चंद्रपूरमध्ये टाटा कॅन्सर हॉस्पिटल स्थापन करण्यास मंजुरी दिली. चंद्रपूरमध्ये 280 कोटी रुपये खर्च करून 140 खाटांचे अत्याधुनिक टाटा कॅन्सर हॉस्पिटल उभारण्यात आले आहे. देशातील पहिली हेलियमविरहित सीटी स्कॅन आणि एमआरआय मशीन या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे, ही चंद्रपूरसाठी अभिमानाची बाब आहे. येत्या 22 डिसेंबर रोजी या अत्याधुनिक कॅन्सर हॉस्पिटलचे उद्घाटन होणार आहे.
महिलांच्या उत्कृष्ट प्रशिक्षण आणि स्वावलंबनासाठी एसएनडीटी विद्यापीठाचे उपकेंद्र:
महिलांना उत्कृष्ट प्रशिक्षण देण्यासाठी बल्लारपूरजवळ 50 एकर जागेत एस.एन.डी.टी. विद्यापीठाचे उपकेंद्र उभारले जात आहे. ज्यामध्ये महिलांना 62 कोर्सेसचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मूल येथे नवीन पॉलिटेक्निक महाविद्यालय उभे राहत आहे. तसेच, चंद्रपूर अभियांत्रिकी महाविद्यालयात टाटा ट्रस्टच्या माध्यमातून 263 कोटी रुपयांचे इन्व्हेंशन आणि इनोव्हेशन सॉफ्टवेअर बसविण्याचे कार्य सुरू आहे.
दुर्गापूर वार्ड क्र. 3 मधील रहिवाशांना दिलासा:
दुर्गापूर वार्ड क्रमांक 3 मधील सर्व घरे हटविण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश होता. मात्र, मी कॅबिनेटमध्ये जाऊन 26 कोटी रुपये विशेष बाब म्हणून मंजूर करून भरण्याची व्यवस्था केली. अन्यथा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, दुर्गापुर वार्ड क्रमांक 3 मधील सर्व घरे हटविली गेली असती आणि येथील रहिवाशी उघड्यावर पडले असते. येथील दिन, दुर्बल, शोषित, पीडित आणि वंचितांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी विधानसभेत जनतेचा आवाज बुलंदपणे उठवत राहीन. दुर्गापूर परिसरात भविष्यात अनेक विकासकामे करायची आहेत, त्यासाठी सर्वांचे सहकार्य आणि आशीर्वाद महत्त्वाचे असल्याचेही आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यावेळी म्हणाले.
					
					
					
					
					


