ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

“आठवणींचा सोहळा, स्नेहबंधांचा मेळावा” 

आवाळपुर विद्यालयात 2000–2001 बॅचचा जल्लोषमय स्नेहसंमेलन उत्सव

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

“संपूर्ण जीवनात आनंदाने जगण्यासाठी शिक्षकवृंद आणि मित्रपरिवार कुटुंबासारखे महत्त्वाचे असतात,” या भावनेने पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय, आवाळपुर येथे 10 वी (बॅच 2000–2001) चा स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात पार पडला.

हा कार्यक्रम आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ, राजुरा यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक देवानंद धाबेकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून से.नि. मुख्याध्यापक प्रभाकर बोभाटे, पुंडलिक परचाके सर, सुरेश चेलकुलवार सर, शामराव वासाडे सर, से.नि. मुख्याध्यापक अशोक राजगडकर सर, बाबाराव वाभिटकर सर आणि सुरेश दुधगवळी सर हे शिक्षकवृंद उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी राजुरा–कोरपना विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा. देवरावजी भोंगळे यांनी भेट देऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, “वर्गमित्रांच्या आठवणी या कुटुंबासारख्या असतात आणि त्या आयुष्यभर मनाला बळ देतात.”

मार्गदर्शनपर भाषणात पुंडलिक परचाके यांनी “जो स्वतःवर प्रेम करतो, तोच इतरांवरही प्रेम करू शकतो. त्यामुळे स्वतःवर प्रेम करा आणि कौटुंबिक तसेच आर्थिक नियोजन शिका,” असा संदेश दिला. तर प्रभाकर बोभाटे यांनी “राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचे अनुकरण करा व ‘ग्रामगीता’चे वाचन करा,” असे सांगितले.

मुख्याध्यापक देवानंद धाबेकर यांनी विद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेत जुन्या आठवणींना उजाळा दिला. मोबाईलच्या अतिरेकी वापरामुळे विद्यार्थ्यांपुढे उभ्या असलेल्या आव्हानांवर त्यांनी विचार मांडले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिवंगत शिक्षक व विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. माजी विद्यार्थ्यांनी व उपस्थित शिक्षकांनी आपल्या भावना आणि आठवणी व्यक्त केल्या. “आनंदाने जगण्यासाठी शिक्षकवृंद व मित्रपरिवार हेच खरे कुटुंब,” असा सर्वांचा एकमुखी निष्कर्ष निघाला.

‘आपला वर्ग – आपला बेंच, आपली शाळा – आपल्या आठवणी’ या भावनेने स्नेहसंमेलन रंगले. सांस्कृतिक कार्यक्रम, विद्यार्थ्यांचा सत्कार, आठवणींचा वर्षाव आणि मैत्रीच्या गप्पांमुळे वातावरण उत्साही बनले.

कार्यक्रमाचे संचालन स्वप्नील बोबडे यांनी केले, प्रस्ताविक रवींद्र शेंडे यांनी सादर केले तर आभार प्रदर्शन संगेश शिंदे यांनी केले. स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या यशस्वी स्नेहसंमेलनासाठी सर्व माजी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि माजी विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये