रोहना येथे राष्ट्रीय खाद्यतेल अभियान अंतर्गत प्रशिक्षण शिबिर संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
रोहना येथे राष्ट्रीय खाद्यतेल अभियान सन २०२५-२६ अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण घेण्यात आले. प्रशिक्षणाच्या अध्यक्ष स्थानी सरपंच लक्ष्मण डोके होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून समर्थ कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नितीन मेहेत्रे, सहाय्यक कृषी अधिकारी अनंता देशमुख, सहाय्यक कृषी अधिकारी नंदकिशोर शिंगणे, सहाय्यक कृषी अधिकारी दिपक दंदाले उपस्थित होते.
उपस्थितांना मार्गदर्शन करीत असताना डॉ. नितीन मेहेत्रे यांनी हवामानामध्ये होत असलेले बदल व त्यानुसार करायचे असलेली शेती पद्धती मधील बदल तसेच चिया सिड, पशुसंवर्धनाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यानंतर सहाय्यक कृषी अधिकारी अनंता देशमुख यांनी शासनाच्या विविध योजना व त्याची अंमलबजावणी मधील येत असलेल्या अडचणी बाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले तसेच योजनांचे फायदे सुद्धा शेतकऱ्यांना उदाहरणासह समजावून सांगितले.
यानंतर सहाय्यक कृषी अधिकारी दिपक दंदाले यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पा अंतर्गत वैयक्तिक योजना विषयी मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे रब्बी हंगामामध्ये पेरणी करण्याच्या अगोदर प्रत्येक पिकाच्या बियाण्याला जैविक कन्सोरशिया व ट्रायकोडर्माची बीजप्रक्रिया करावी असे सुचविले.शेतकऱ्यांना महाडीबीटीवरील विविध योजनांतील पूर्वसंमत्या बाबत माहिती दिली तसेच ऑगस्ट व सप्टेंबर मध्ये झालेल्या नुकसानी बाबत कोणाचेही डॉक्युमेंट देणे बाकी असेल त्यांनी द्यावे असे सुद्धा सुचविले.
याप्रसंगी सहाय्यक कृषी अधिकारी नंदकिशोर शिंगणे यांनी पोकरा प्रकल्पातील शेती शाळेबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी रोहना गावचे सहाय्यक कृषी अधिकारी दिपक दंदाले यांनी प्रशिक्षणासाठी उपस्थित असलेले डॉ. नितीन मेहेत्रे ,अनंता देशमुख ,नंदकिशोर शिंगणे, सरपंच लक्ष्मण डोके उपस्थित शेतकरी बांधवांचे आभार व्यक्त केले. या कार्यशाळेत मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग उपस्थित होता.



