निर्माणी मुख्य प्रवेशद्वाराजवळच भरलेल्या गॅस सिलेंडरची खुलेआम विक्री
नियमांचे उल्लंघन : सुरक्षेला धोका

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.अतुल कोल्हे
आयुध निर्माणी वसाहती मधील कंज्यूमर्स को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या माध्यमातून वितरित केल्या जाणाऱ्या एचपी गॅस सिलेंडरची विक्री अचानक नागपूर – चंद्रपूर महामार्गावरील निर्माणीच्या मुख्य प्रवेशद्वारा लगत सुरक्षा नियमांना बगल देऊन विना सुरक्षा मोकळ्या जागेत केली जात आहे.भरलेले गॅस सिलेंडर अशा पद्धतीने विक्री करणे धोकादायक आहे. त्यामुळे या ठिकाणी होत असलेले वितरण तात्काळ बंद करावे अशी मागणी नागरिक करीत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून कंज्यूमर्स को-ऑपरेटिव्ह सोसायटी द्वारा एच.पी. कंपनीच्या गॅस सिलेंडरचे वितरण परिसरातील नागरिकांना सोसायटीच्या निर्माणी वसाहती मधील गोडाऊन मधून तसेच सोसायटीच्या गाडीने ग्राहकांना घरपोच केल्या जात आहे. परंतु एक महिना आधी वसाहती मधील एका शाळेच्या विद्यार्थिनीचा दुचाकी चालकाने अपहरणाचा प्रयत्न केला.
या घटनेनंतर निर्माणी सुरक्षा विभागाने निर्णय घेऊन बाहेरील व्यक्तींना निर्माणिच्या वसाहती परिसरात प्रवेश देताना मुख्य प्रवेशद्वारावर चौकशी करूनच सोडण्याचे आदेश दिले. त्याचाच भाग म्हणून वसाहती बाहेरील सिलेंडर ग्राहकांना नागपूर – चंद्रपूर महामार्गावरील मोकळ्या जागेत सिलेंडर देण्याचे आदेश सुरक्षा विभागाने सोसायटीला दिले. विना सुरक्षा खुल्या जागेत भरलेल्या गॅस सिलेंडरची विक्री करणे हे कायद्याने चुकीचे तसेच सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक आहे. दुर्दैवाने एखादी घटना घडून जीवितहानी झाल्यास त्यास जबाबदार कोण? असा प्रश्न परिसरातील नागरिक करीत आहे. सुरक्षा विभागाने असे न करता वसाहतीमधील प्रत्येक शाळेत सुरक्षा व्यवस्था पुरवल्यास हा प्रश्न निकाली निघू शकतो. असे ग्राहकांना वेठीस धरण्यास काय अर्थ.
निर्माणी वसाहती मधील एका शाळेतील विद्यार्थिनीच्या अपहरण प्रयत्नाच्या प्रकरणानंतर सुरक्षेचा भाग म्हणून निर्माणी सुरक्षा विभागाने आम्हास आदेश दिल्याने ही व्यवस्था करावी लागली. येत्या दोन-चार दिवसात त्याबाबत निर्माणी महाप्रबंधक आणि कर्नल यांच्या सोबत चर्चा करून हा प्रश्न निकाली काढू.
प्रवीणकुमार पांडे, व्यवस्थापक कंज्यूमर्स को-ऑपरेटिव सोसायटी, आयुध निर्माणी,चांदा.