जिवतीच्या खेळाडूने राष्ट्रीय थाईबॉक्सिंग स्पर्धेत पटकावले सुवर्ण पदक
महेंद्रने जिल्ह्याच्या शिरपेचात रोवला मनाचा तुरा ; पहिल्याच प्रयत्नात मिळविले यश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- उत्तर प्रदेश राज्यातील वाराणसी येथील अनंत सेलीब्रेशन हॉल असापूर चौराहा येथे २९ ते ३१ ऑगस्ट दरम्यान ६ वी राष्ट्रीय थाईबॉक्सिंग स्पर्धा २०२५ पार पडली. या राष्ट्रीय थाईबॉक्सिंग स्पर्धेत संपूर्ण भारतातुन जवळपास ७०० खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
यात चंद्रपूर जिह्यातील आदिवासी बहुल, अतिदुर्गम जिवती तालुक्यातील शेडवाही (लां) या छोट्याशा गावातील सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातील महेंद्र सोमू सिडाम यांनी उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक मिळविले आहे. यामुळे महेंद्रने जिवती तालुक्यासह जिल्ह्याच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला आहे.
समस्या व अडथळे यावर मात करून पुढे जाण्याची मनात जिद्द ठेवली तर आकाशालाही गवसणी घालता येते असाच महेंद्रचा प्रवास आहे. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने सराव करण्यासाठी आवश्यक साहित्य सुद्धा मिळू शकले नाही.
मात्र, महेंद्रने या परिस्थितीवर मात करत जिद्दीने व चिकाटीने प्रशिक्षक हेमंत चावके यांच्याशी सतत संपर्कात राहून मोबाईलच्या माध्यमातून सर्व धडे वीडियोद्वारे घेतले. व आपल्या शेतातील झाडाला गाद्या बांधून मी यश मिळवणारच म्हणून सराव केला. यांचा परिणाम म्हणजे वाराणसी येथे झालेल्या राष्ट्रीय थाई बॉक्सिंग स्पर्धेत पहिल्याच प्रयत्नात सुवर्णपदक प्राप्त केले. महेंद्रच्या या यशाचे विविध स्तरातून कौतुक होत आहे.