ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अखेर घोडपेठ येथील महामार्गावरील खड्डे दुरूस्तीला सुरूवात

तंटामुक्त समिती अध्यक्ष विवेक लोणे यांच्या मागणीला यश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

         नागपूर–चंद्रपूर या महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्गावर पावसामुळे मोठमोठे खड्डे निर्माण झाले होते. घोडपेठ परिसरातून जाणाऱ्या या रस्त्यावर दररोज शेकडो वाहने धावत असतात. मात्र रस्त्यावर पडलेल्या खोल खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अनेकदा अपघात घडले असून काहींना आपला जीव गमवावा लागल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे प्रवाशांचा संताप वाढला होता.

खड्ड्यांमुळे वाहनांचे टायर फुटणे, सस्पेन्शन तुटणे, इंजिनला धक्के बसणे यांसारख्या तांत्रिक अडचणी मोठ्या प्रमाणावर दिसून आल्या होत्या. विशेषत: दोनचाकी वाहनचालकांना धोका अधिक वाढला होता. वाहने अचानक थांबल्याने वाहतूक कोंडीचेही चित्र पाहायला मिळत होते. प्रवाशांचा प्रवास धोकादायक होत असल्याने रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी पुढे येत होती.

या पार्श्वभूमीवर घोडपेठ येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विवेक लोणे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधले. त्यांनी सांगितले की, “नागपूर–चंद्रपूर महामार्ग हा शेकडो प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासाचा मुख्य आधार आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे.

त्यामुळे विभागाने ताबडतोब दुरुस्तीचे काम सुरू करावे.” त्यांच्या या मागणीची दखल घेत शुक्रवारी सकाळी ही बातमी दै. पुण्यनगरी सह ईतरही वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झाली. बातमी प्रसिद्ध होताच सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्परता दाखवत त्याच दिवशी म्हणजेच शुक्रवारी दुपारी ११ वाजता घोडपेठ येथील खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात केली. स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले.

दरवर्षी पावसाळ्यात अशीच परिस्थिती उद्भवते आणि प्रशासनाकडून तात्पुरते खड्डे बुजविण्याचे काम केले जाते. परंतु कायमस्वरूपी दर्जेदार दुरुस्ती न झाल्याने काही महिन्यांत पुन्हा खड्डे निर्माण होतात. त्यामुळे अपघातांचा धोका कायम राहतो.

यावर दीर्घकालीन उपाययोजना करून महामार्ग प्रवाशांसाठी सुरक्षित करण्याची मागणी आता घोडपेठ येथील तंटामुक्त समिती अध्यक्ष विवेक लोणे यांनी केली आहे. घोडपेठ परिसरातील या समस्येवर स्थानिक पातळीवर आवाज उठवणाऱ्या तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विवेक लोणे यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असले तरी नागरिकांना कायमस्वरूपी दिलासा हवा आहे.

या महामार्गावरील प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने अधिक जबाबदारीने पुढाकार घेणे आवश्यक आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये