ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वेकोली ठेकेदारी कामगारांचे वेतन शोषण

काँग्रेसकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, आंदोलनाचा इशारा

चांदा ब्लास्ट

घुग्घुस (चंद्रपूर) : देशभरात स्वातंत्र्याचा अमृतकाळ सुरू असताना घुग्घुस परिसरातील वेकोलीत ठेकेदारीवर काम करणाऱ्या कामगारांवर अमानवीय अन्याय व शोषण होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

वेकोलीच्या राजीव रतन रुग्णालयातील स्वच्छताकर्मी, रुग्णवाहिकेचे चालक, तसेच वेकोली कॅन्टीन, शाळा बस, ऍम्ब्युलन्स, व्हीटीसी सेंटर, व्हीआयपी गेस्ट हाऊस व मनोरंजन केंद्र येथे कार्यरत ठेकेदारी कामगारांना रेकॉर्डवर संपूर्ण वेतन दाखवले जात असून, प्रत्यक्षात त्यांच्या हातात फक्त 175 ते 350 रुपये एवढेच मोबदला दिला जातो. महिन्याला केवळ 5000 ते 10,000 रुपयांमध्ये हे कामगार काम करायला मजबूर असल्याचा आरोप करण्यात आला आहे. कामगारांनी तक्रार केली तर त्यांना कामावरून कमी केले जाते, असेही समोर आले आहे.

कोल इंडियाच्या राष्ट्रीय वेतन समझोता (NCA-11) नुसार, कोल इंडिया अंतर्गत येणाऱ्या WCL च्या ठेकेदारी कामगारांना दररोज 1176 ते 1266 रुपये मजुरी देणे बंधनकारक आहे. मात्र घुग्घुस क्षेत्रात वेकोली अधिकारी व ठेकेदार संगनमताने कामगारांचे वेतन हडप करत असल्याने कामगारांवर अतोनात आर्थिक छळ होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या प्रकरणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजू रेड्डी व कामगार नेते सय्यद अन्वर यांनी पदाधिकाऱ्यांसह जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच कामगारांना किमान वेतनानुसार वेतन द्यावे, अशी ठाम भूमिका मांडली आहे.

कामगारांचे आर्थिक शोषण तातडीने थांबविण्यात आले नाही, तर वेकोली व ठेकेदारांविरोधात काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा रेड्डी यांनी दिला आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये