महसूल विभाग म्हणजे ‘लोकसेवा’ – पालकमंत्री डॉ. उईके
महसूल सप्ताहाबद्दल जिल्हा प्रशासनाला शुभेच्छा पत्र

चांदा ब्लास्ट
सामान्य नागरिकांसाठी सरकार म्हणजे महसूल विभाग. कोतवाल ते जिल्हाधिकारी हे सामान्य नागरिकांकरिता शासनाचे प्रतिनिधी म्हणून समर्पित भावनेने कर्तव्य बजावतात. त्यामुळे त्यांच्या कामात पारदर्शकता, जलद गती, आणि लोकाभिमुखता असणे अत्यावश्यक आहे. महसूल विभाग हा केवळ प्रशासनाचा भाग नाही, तो ‘लोकसेवेचा खरा प्रतिनिधी’ आहे. त्यामुळे महसूल विभागात काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचा-याकडून निष्ठा, पारदर्शकता आणि सामाजिक जाणिव यांचा सदैव विचार व्हावा व कालमर्यादेत नागरिकांची कामे पार पाडण्यास प्राधान्य असावे, अशी अपेक्षा राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी व्यक्त केली.
१ ते ७ ऑगस्ट दरम्यान जिल्ह्यात साजरा होणा-या महसूल सप्ताहानिमित्त दिलेल्या शुभेच्छा पत्रात पालकमंत्री डॉ. उईके म्हणाले, महसूल विभाग प्रशासकीय यंत्रणेचा केंद्रबिंदू म्हणून ओळखला जातो. शासनाच्या विविध योजना, धोरणे, आदेश आणि कामकाजाची प्रभावी अंमलबजावणी करणे ही महसूल विभागाची जबाबदारी आहे. ‘गाव ते राजधानी’ असा व्यापक कार्यक्षेत्र असलेला हा विभाग शासन आणि जनतेमधील एक दुवा म्हणून कार्य करतो. ब-याच वेळा ‘महसूल’ या शब्दाचा अर्थ फक्त आर्थिक उत्पन्नाशी जोडला जातो. पण, प्रत्यक्षात हा विभाग जमिनीचे अधिकार अभिलेख अद्यावतीकरण, फेरफार नोंदणी, शेतपिक नुकसानीचे पंचनामे, सामाजिक अर्थसहाय्य योजना, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन व निवडणुका अशा असंख्य कार्यामध्ये अहोरात्र सहभागी असतो. ख-या अर्थाने महसूल विभाग शासनाच्या यंत्रणेचा कणा आहे.
गेल्या काही वर्षांत महसूल विभागाने डिजिटायझेशन, ऑनलाईन सेवा, ई-सातबारा, ई-फेरफार, मोबाईल अॅप्स, नागरिक सेवा केंद्रे याद्वारे एक सुलभ, पारदर्शक आणि तत्पर सेवा देण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. यामुळे नागरिकांना सरकारी कार्यालयात चकरा माराव्या लागत नाहीत, हे एक सकारात्मक परिवर्तन आहे.
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वने मोठ्या प्रमाणात असल्यामुळे वनविभाग आणि महसूल विभाग यांच्यातील योग्य समन्वय असल्याने, वनहक्क प्रकरणे, निर्वाणीकरण, झुडपी जमिनीचे रूपांतरण, वनीकरणासाठी लागणारी जमीन, यामुळे अनेक विकासकामे प्रगतीपथावर आहेत. यासंबंधी महसूल विभागाची भूमिका निर्णायक ठरते. तसेच चंद्रपूर जिल्हयात मोठ्या प्रमाणात वन जमीन असल्याने येथील पारंपरिक आदिवासी समुदायाला वनहक्क दावे मंजुर करुन, त्यांच्या हक्काची जमीन कसण्याकरिता, उपलब्ध करून देण्यात आली. यामुळे पिढयानपिढ्या दुर्लक्षित असलेला आदिवासी समुदाय हा विकासाच्या मुख्या प्रवाहात आला आहेत.
महसूल विभागाच्या माध्यमातूनच शासनाच्या विविध योजना समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचतात. म्हणून महसूल विभागाचा सन्मान, त्याचे कार्य ओळखणे, आणि ते अधिक प्रभावीपणे घडवणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. चंद्रपूर जिल्हयातील पाणंद रस्ता योजना, चॅटबोट, शस्त्र परवाना अॅप, इत्यादी उपक्रम राज्यस्तरावर अग्रस्थानी ठरले. या विभागातील कर्मचारी व अधिकारी वर्गाने प्रामाणीकपणे कार्य केल्यामुळे चंद्रपूर जिल्हा लोकाभिमुख प्रशासनाचा उत्कृष्ठ नमुना बनला आहे. त्याचेच फलीत म्हणून महाराष्ट्र शासनाच्या १०० दिवसाच्या अभियानामध्ये चंद्रपूर जिल्हा अव्वल स्थानी राहिलेला आहे.
महसूल विभागाच्या माध्यमातुन आपण ‘शासन आपल्या दारी’ हे तत्व प्रत्यक्षात उतरवित आहोत. यापुढेही महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात येणा-या विविध योजनांच्या अंमलबजाणी करिता जिल्ह्यातील महसूल विभाग महत्वाची भूमिका बजावेल, अशी अपेक्षा पालकमंत्री डॉ. उईके यांनी व्यक्त केली.