ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विदर्भ महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- विदर्भ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, जिवती येथे थोर समाजसुधारक आणि लोककवी अण्णाभाऊ साठे यांची जयंती तसेच स्वातंत्र्य संग्रामातील महान नेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी अत्यंत प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. हा कार्यक्रम महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना (NSS) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला.

महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. एस. एच. शाक्य यांनी विशेष संदेशाद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या संदेशात त्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या लोकसाहित्य आणि समाजक्रांतीतील भूमिकेचा उल्लेख करत विद्यार्थ्यांनी वंचित, शोषित समाजासाठी संवेदनशीलतेने काम करावे असे सांगितले. तसेच लोकमान्य टिळक यांचे राष्ट्रहितासाठीचे योगदान, स्वराज्याचा संदेश, आणि शिक्षणावरील भर हे आजच्या पिढीने आत्मसात करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व महान विभूतींच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून झाली. त्यानंतर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या कार्याचा सामाजिक, शैक्षणिक आणि ऐतिहासिक संदर्भात आढावा घेण्यात आला. भाषणे, माहितीपट सादरीकरण व चित्रप्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी या दोन नेत्यांना आदरांजली अर्पण केली.

कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी सांस्कृतिक विभाग समन्वयकांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये