‘लैंगिक छळा विरोधी सजगता – सुरक्षित समाजाची वाटचाल’ – प्रवीण जाधव ठाणेदार जिवती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- विदर्भ महाविद्यालय, जिवती येथील मराठी विभाग, व महिला सक्षमीकरण कक्षाच्या वतीने लैंगिक छळ, कायदा व सुव्यवस्था यावर विद्यार्थ्यांकरिता जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. एस. एच. शाक्य तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रवीण जाधव, ठाणेदार – जिवती हे उपस्थित होते. आपल्या प्रभावी मार्गदर्शनात जाधव यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, लैंगिक छळ ही केवळ वैयक्तिक नाही, तर सामाजिक पातळीवरील गंभीर समस्या आहे.
युवक-युवतींनी कायद्याचे भान राखून सजग नागरिक बनले पाहिजे. महिलांच्या सन्मानाचे आणि सुरक्षिततेचे रक्षण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. कोणीही अन्याय सहन करू नये, पोलीस यंत्रणा सदैव तुमच्यासोबत आहे.” त्यांनी POCSO कायदा, POSH कायदा, आणि सायबर गुन्हे यासारख्या विषयांवरही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. “सजग राहा, सुरक्षित राहा” हा संदेश त्यांनी सर्वांना दिला. त्यांनी आपल्या संपुर्ण जीवनातील खडतर प्रवास, तसेच जिद्द, चिकाटी मुळे मिळालेले यश याबद्दलही मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्य डॉ. शाक्य यांनी लैंगिक छळाविरोधात जनजागृती आणि संवेदनशीलतेच्या गरजेवर भर दिला. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये कायदेशीर जाणीव, सामाजिक भान आणि सुरक्षित वातावरणाची जाणीव निर्माण होते, असे नमूद केले. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. देशमुख, प्रा. मंगाम, प्रा. लांडगे मंचावर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी कार्यक्रमास उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गजानन राऊत मराठी विभाग प्रमुख यांनी तर आभारप्रदर्शन डॉ. वैशाली डोर्लीकर महिला सक्षमीकरण कक्ष यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.