कर्जाला कंटाळून देवलागुडा येथील शेतकऱ्याची आत्महत्या

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- देवलागुडा येथील रहिवासी भगवान गोपिनाथ राठोड (वय ५८) यांनी सततची नापिकी आणि कर्जाच्या ओझ्याला कंटाळून शेताजवळील सागवान झाडाच्या फांदीला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी जिवती पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मर्ग दाखल केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, भगवान राठोड हे नेहमीप्रमाणे आजही गाय चारण्यासाठी शेतात गेले होते,बराच वेळ होऊनही वडिल घरी आले नाही म्हणून लहान मुलगा शेतात गेला असता वडिल झाडाला गळफास घेतल्याचे दिसून येताच आरडाओरडा करित घरी फोन लावून घटनेची माहिती दिली.अंगावर वाढलेलं कर्ज आणि पिकाला टाकण्यासाठी खत खरेदीला जवळ पैसे नसल्याने ते मागिल काही दिवसांपासून अस्वस्थ दिसत होते त्यामुळे आर्थिक संकटामुळेच त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असावे असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
स्थानिकांनी ही घटना पाहिल्यानंतर तातडीने पोलिसांना माहिती दिली. जिवती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला व पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, पोलिसांनी मर्ग दाखल करून तपास सुरू केला आहे.