आधार कार्ड केंद्रावर नागरिकांची भटकंती –
कोरपना तालुक्यातील केंद्रांवर सेवा अपुरी ; नागरिक त्रस्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
कोरपना तालुक्यातील विविध आधार केंद्रांवर नागरिकांना आवश्यक सेवा मिळत नसल्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून त्यांची अक्षरशः भटकंती सुरू आहे. केंद्रांवर केवळ मोबाईल नंबर लिंक करणे एवढीच सेवा दिली जाते. नाव दुरुस्ती, पत्ता बदल, जन्मतारीख दुरुस्ती, लिंग बदल यासारख्या अत्यावश्यक अद्ययावत सेवा नाकारल्या जात आहेत.
नागरिक आधार केंद्रावर गेले असता “हे काम होत नाही”, “फक्त मोबाईल लिंकिंग करता येते”, अशा प्रकारची उत्तरे देण्यात येतात. यामुळे वृद्ध, महिला, विद्यार्थ्यांचे फार हाल होत आहेत. शालेय शिक्षण, शिष्यवृत्ती, बँकिंग सेवा, आरोग्य सेवा, सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार अद्ययावत असणे गरजेचे आहे. मात्र त्यासाठी केंद्रावर गेल्यावर मिळणारा नकारात्मक प्रतिसाद हा नागरी सुविधांवरील विश्वास डळमळीत करतोय.
कोरपना तालुक्यातील अनेक नागरिकांनी सांगितले की, अनेक वेळा आधार अपडेटसाठी प्रवास करावा लागतो. काहीजण चंद्रपूर, बल्लारपूर, गडचांदूर अशा लांबच्या केंद्रांवर जाऊन अर्धा दिवस घालवतात, तरीदेखील त्यांना संपूर्ण सेवा मिळेल याची खात्री नसते. हे चित्र ग्रामीण भागात आणखी भीषण आहे.
यासंदर्भात काही आधार ऑपरेटर्सना विचारले असता त्यांनी सांगितले की, “UIDAI ने काही नियम कठोर केले असून कोणत्याही चुकीच्या अपडेटवर संबंधित ऑपरेटरवर आर्थिक दंड (penalty) आकारला जातो. त्यामुळे अनेकजण जोखीम न घेता फक्त मोबाईल लिंकिंग सारखे कमी धोका असलेले काम करत आहेत.”
मात्र हे कारण खरे असले तरी त्याचा फटका थेट नागरिकांवर बसतो. शासनाकडून आधार अपग्रेडसाठी केंद्रांना पूर्ण क्षमतेची उपकरणे, मशीन, बायोमेट्रिक साधने देण्यात आलेली आहेत. तरीही त्याचा लाभ प्रत्यक्ष नागरिकांना मिळत नाही, ही खेदाची बाब आहे. जेवढी सेवा ऑनलाइन किंवा मशीनवर उपलब्ध आहे, तेवढी सेवा प्रत्येक केंद्रावर मिळायला हवी.
गावागावांतून येणारे शेतकरी, कामगार, विद्यार्थी, महिला यांना आधार केंद्रावरून रिकाम्या हाताने परतावे लागते हे चित्र बदलण्याची गरज आहे. शासनाने याबाबत तातडीने लक्ष घालून आधार ऑपरेटरवर अन्यायकारक दंडात्मक धोरणाचा फेरविचार करावा, तसेच सेवा प्रक्रियेतील अडचणी दूर करून आधार केंद्रे सर्वांसाठी प्रभावीपणे चालवावीत, हीच नागरिकांची मागणी आहे.