ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गडचांदूर शहरातील नाली बांधकाम अपूर्ण

पावसाचे पाणी घरात शिरण्याची वेळ ; नागरिक हैराण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

शहरातील काही भागांमध्ये सुरू असलेले नाली बांधकाम अपूर्ण असल्यामुळे नागरिकांना पावसाळ्यात नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मागील दोन दिवसांपासून पडत असलेल्या जोरदार पावसामुळे नाल्यांचे पाणी रस्त्यावरून वाहू लागले असून, काही ठिकाणी नागरिकांच्या घरांमध्येही पाणी शिरत आहे. विशेषतः डोहे लेआउट परिसर, नवीन वसाहती आणि मुख्य रस्त्यालगतच्या घरांमध्ये पाणी साचून रहिवाशांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

या परिसरात नाल्यांचे बांधकाम काही भागातच झाले असून जेथे नाल्यांची अत्यंत गरज आहे, तेथे अद्याप काम सुरूच झालेले नाही. नागरी सुविधांची जबाबदारी असलेल्या नगरपरिषद बांधकाम विभाग व आरोग्य विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

या अपूर्ण आणि अर्धवट नाल्यांमुळे पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी घरात, अंगणात आणि रस्त्यावर साचत आहे. यामुळे आरोग्याचे मोठे धोके निर्माण होत असून डेंग्यू, मलेरिया यासारख्या आजारांचा धोका वाढत आहे. वाहतूकही विस्कळीत होत आहे आणि लहान मुले व वृद्ध व्यक्तींना विशेषतः त्रास सहन करावा लागत आहे.

शासनाने तातडीने या प्रश्नाची गंभीर दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अपूर्ण नाली बांधकाम त्वरित पूर्ण करावे आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये